नंदुरबार : रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा; ९६ हजारांचा ऐवज प्रवाशाला केला परत | पुढारी

नंदुरबार : रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा; ९६ हजारांचा ऐवज प्रवाशाला केला परत

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : रिक्षात प्रवाशाने विसरलेला ९६ हजारांचा ऐवज अवघ्या तासाभरात नंदुरबार शहर पोलिसांनी शोधून दिला. ती पर्स ऐवजासह प्रामाणिकपणे परत करणाऱ्या रिक्षाचालकाचा पोलीस अधीक्षकांनी सत्कार देखील केला. देवेंद्रसिंग राजूसिंग परदेशी (रा. परदेशीपुरा) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.

रुपाली रामचंद्र धनगर (रा उधना, सुरत) ह्या त्यांच्या पतीसह बुधवारी नंदुरबार येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या नंदुरबार बस स्थानकावर उतरल्या आणि एका रिक्षात बसून चौफुलीवर गेल्या. तेथे रिक्षातून उतरल्यानंतर त्यांनी रिक्षा चालकास भाड्याचे पैसे दिले. त्यानंतर सदर रिक्षा चालक तिथून निघून गेला. काही वेळातच रुपाली धनगर यांच्या लक्षात आले की, त्यांच्याजवळ असलेली त्यांची पर्स व त्यामध्ये असलेले ३००० रुपये रोख रक्कम व १७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ही रिक्षामध्येच राहिली. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या आणि त्यांच्या पतीसह तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी घडलेली हकीगत पोलीस हवालदार वसंत वसावे यांना सांगितली.

त्यानंतर शहर पोलीस ठाणेचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रतापसिंग मोहिते यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना नंदुरबार येथील रिक्षा स्टॉपवर तपासकामी पाठविले. त्या ठिकाणी पोलिसांनी डिएसके मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्याआधारे वरील नमुद महिला व तिचे पती हे ज्या रिक्षात बसले होते.

ती रिक्षा पोलिसांनी निष्पन्न केली. सदर, रिक्षेचा शोध घेतला असता ती रिक्षा रेल्वे स्टेशन परिसरात आढळली. तेव्हा रिक्षाचे चालकास पोलिसांनी प्रवासी महिलेच्या पर्सबाबत विचारणा केली. यावेळी रिक्षा चालकाने त्यांची रिक्षात अनावधानाने राहून गेलली पर्स सांभाळून ठेवली असल्याचे पोलिसांना कळविले. त्यानंतर रिक्षा चालकाने प्रवासी महिलेची पर्स नंदुरबार शहर पोलीस ठाणेला येवून समक्ष हजर केली.

हेही वाचलंत का?

Back to top button