ग्रामपंचायत निवडणूक : बदलत्या राजकारणाची दिशा दाखविणारा निकाल | पुढारी

ग्रामपंचायत निवडणूक : बदलत्या राजकारणाची दिशा दाखविणारा निकाल

कोल्हापूर, विकास कांबळे : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत महाविकास आघाडीला यश मिळाले असले, तरी जिल्ह्यात एकही आमदार नसताना भारतीय जनता पक्ष व शिवसेना ठाकरे गटाने गावपातळीवर मारलेली मुसंडी जिल्ह्यातील बदलत्या राजकारणाची दिशा दाखविणारी आहे.

जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही तशीच परिस्थिती सध्या शिवसेना ठाकरे गटाची आहे. भाजपने काँग्रेसच्या ताब्यात असणार्‍या जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला (शिंदे गट) ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चांगलेच यश मिळाले आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व आमदार व खासदार शिंदे गटात गेल्यामुळे जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले. शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा सध्या जिल्ह्यात एकही आमदार, खासदार नाही. तरीदेखील सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ठाकरे गटाने चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसते.

विशेषत:, जिल्ह्याचे नेते आ. हसन मुश्रीफ यांच्या कागल व आ. ऋतुराज पाटील यांच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आ. ऋतुराज पाटील यांना आत्मचिंतन करावयास लावणारा हा निकाल आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये आ. पाटील व महाडिक गटातच प्रामुख्याने लढत झाली. परंतु, काही ठिकाणी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आघाडी केली होती. आ. सतेज पाटील व महाडिक गट एकत्र लढले, तर काय निकाल लागू शकतो हे देखील काही ग्रामपंचायतींच्या निकालाने दाखवून दिले आहे.

जनसुराज्य शक्ती पक्षाचा शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात प्रभाव आहे. परंतू या पक्षाच्या ताब्यात असणार्‍या काही ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. त्यामुळे आपल्याच गडात आ. विनय कोरे यांना डागडुजी करावयास लावणारा निकाल असल्याचे मानले जाते.

शिरोळ तालुक्यात शिंदे गटाच्या आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपला गड राखण्यात यश मिळविले आहे. परंतू स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा प्रभाव मात्र पुर्वीसारखा दिसत नाही. हातकणंगले तालुक्यात काँग्रेसची पिछेहाट झाली असून त्याठिकाणी भाजप वाढल्याचे दिसते. भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादीने आपले वर्चस्व राखले आहे. या तालुक्यात शिंदे गट दोन नंबरला व त्यानंतर काँग्रेस आहे. राधानगरी तालुक्यात शिंदे गटाचे आ. प्रकाश आबिटकर यांना मात्र आपला प्रभाव फारसा दाखविता आला नाही.

गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रभाव या निवडणुकीत कायम राहिला असला तरी भारतीय जनता पक्षाने याठिकाणी घेतलेली आघाडी भविष्याच्या राजकारणात धोका ठरू शकते. कागलमधील काही मोठ्या ग्रामपंचायती राष्ट्रवादीला आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले नाही. खा. संजय मंडलिक, माजी आ. संजय घाटगे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात गट भक्कम राखाला आहे. कागलमध्ये भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना मिळालेले यश विरोधकांना मात्र धडकी भरविणारे आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्या होत असल्यामुळे नेतेमंडळी फारसे लक्ष घालत नसत. परंतु, सरपंचपदाची थेट जनतेतून निवड करण्याच्या निर्णयामुळे नेत्यांना काही ठिकाणी प्रत्यक्ष; तर काही ठिकाणी अप्रत्यक्ष सहभागी व्हावे लागले. काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यात भाजप व शिंदे गटाने चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसते.

या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र काही ठिकाणी चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीत हक्काच्या ग्रामपंचायती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या ताब्यात राखता आल्या नसल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे.

Back to top button