नागपूर मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार | पुढारी

नागपूर मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या प्रश्नांसह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर 19 डिसेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शनिवारी करण्यात आला. अध्यक्षस्थानी आ. हसन मुश्रीफ होते.

आ. मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लाखो शेतकर्‍यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या दरम्यानच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका नाहीत, अशा गावांमधून जास्तीत जास्त कार्यकर्ते आणण्याचा प्रयत्न करावा. यासाठी प्रथम तालुका पातळीवर बैठका घ्याव्यात. यामध्ये मोर्चासाठी येणार्‍यांचा आकडा निश्चित करावा. त्यानुसार नियोजन करणे सोयीचे होईल.

लांबलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची नुकसानभरपाई मिळावी, प्रोत्साहनपर अनुदानाची साधारणपणे 600 कोटींची रक्कम अद्याप शेतकर्‍यांना मिळालेली नाही. ती त्वरित मिळावी, आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकरीविरोधी असलेल्या या सरकारला जागा दाखविण्यासाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले आहे.

यावेळी माजी आ. राजीव आवळे, संभाजी पोवार यांचीही भाषणे झाली. बैठकीस आ. राजेश पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी आ. के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील, किसन चौगले, महेंद्र चौगले आदी उपस्थित होते.

Back to top button