कोल्हापूरसह एसटीचे चोवीस आगार बांधणार ‘बीओटी’वर | पुढारी

कोल्हापूरसह एसटीचे चोवीस आगार बांधणार ‘बीओटी’वर

मुंबई, चंदन शिरवाळे : साडेबारा हजार कोटी रुपयांच्या तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला संजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर कोल्हापूरसह 24 आगारांचा विकास करण्याचे निश्चित केले आहे.

खासगी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला दररोज तोटा सहन करावा लागत आहे. लांब पल्ल्यांच्या काही बसेसचा अपवाद वगळल्यास एसटीची ग्रामीण भागात अधिक धाव आहे. परंतु, ग्रामीण भागातील रस्ते खराब असल्याचा फटका एसटीच्या बसला होत आहे. बसेसच्या दुरुस्तीवर महामंडळाला अधिक खर्च करावा लागत आहे. तसेच वाहनांच्या सुट्या भागाच्या वाढत्या किमती आणि इंधन दरवाढीमुळे एसटीचे कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीत कर्मचार्‍यांच्या वेतनावर दरमहा 360 कोटी रुपये खर्च येत आहे. यापैकी केवळ 100 कोटी रुपये सध्या राज्य शासन देत आहे. त्यामुळे महामंडळाचा एकूण तोटा साडेबारा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी आता एसटीने शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आगारांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी लवकरच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्तीसाठी जागतिक टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे.

परिवहन महामंडळाने यापूर्वीही बसपोर्टसाठी बीओटी योजना जाहीर केली होती. मात्र, आगारांच्या जागांवरून कंत्राटदार आणि महामंडळात एकमत होत नसल्यामुळे अनेक आगारातील कामे रेंगाळली आहेत. आतापर्यंत एकाही आगारात बसपोर्ट सुरू होऊ शकले नाहीत. आता अत्याधुनिक बांधकाम करायचे आणि उर्वरित जागांचा खासगी विकासकांमार्फत बीओटी तत्त्वावर विकास करायचा अशी ही योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला सहमती दर्शवली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात सुमारे 5 हजार कोटींहून अधिक निधी एसटीला मिळणार आहे. यामुळे तोट्यातील एसटी महामंडळाला संजीवनी मिळेल, असा दावाही या अधिकार्‍याने केला.

बीओटीवर बांधण्यात येणारी आगारे

राजेंद्रनगर व नॅन्सी कॉलनी (बोरिवली), मुंबई सेंट्रल, कुर्ला, विद्याविहार, ठाणे, भिवंडी, शिवाजीनगर (पुणे), स्वारगेट, पिंपरी चिंचवड, लोणावळा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नाशिक महामार्ग, जळगाव सीबीएस, जळगाव शहर, धुळे, नागपूर आणि अमरावती – मोरभवन नागपूर, हिंगणा, अमरावती, अकोला.

Back to top button