कोल्हापूर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता झुंबड | पुढारी

कोल्हापूर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता झुंबड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता गुरुवारी अक्षरश: झुंबड उडाली होती. आज सरपंचपदासाठी 685, तर सदस्यपदासाठी 4 हजार 697 उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ऑफलाईन अर्ज भरण्यास, तसेच अर्ज स्वीकारण्याची वेळ वाढविल्यामुळे इच्छुकांना थोडा दिलासा मिळाला आहे. आजअखेर सरपंचपदासाठी 1 हजार 378, तर सदस्यपदासाठी 7 हजार 972 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.

उमेदवारी अर्ज भरताना इच्छुक उमेदवार वेळ, काळ आणि दिवस पाहतात. दि. 28 नोव्हेंबरपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 3 दिवसांत सरपंचपदासाठी 693 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आजचा दिवस शुभ असल्यामुळे आणि उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व केंद्रांवर गर्दी झाली होती. आज एका दिवसात 681 उमेदवारांनी 685 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसोबत जाणार्‍यांना पोलिस अडवत होते. त्यामुळे काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले. गेल्या तीन दिवसांत सदस्यपदासाठी 3 हजार 272 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज एका दिवसात 4 हजार 697 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

सरपंचपदासाठी आज अखेर 1 हजार 378 उमेदवारी अर्ज, तर सदस्यपदासाठी 7 हजार 972 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. करवीर तालुक्यातून सदस्यपदासाठी सर्वाधिक 802, तर सर्वात कमी 57 उमेदवारी अर्ज गगनबावडा तालुक्यातून दाखल झाले आहेत.

Back to top button