सॅनिटरी नॅपकिन्समध्ये घातक रसायने | पुढारी

सॅनिटरी नॅपकिन्समध्ये घातक रसायने

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : स्त्रियांच्या मासिक पाळीच्या कालावधीत सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याविषयी जगभरातून जनजागृतीचा गजर केला जात असला, तरी भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या काही सॅनिटरी नॅपकिन्समध्ये मानवी आरोग्याला घातक रसायने वापरली जात असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. या रासायनिक पदार्थांमुळे कर्करोगासह नैसर्गिक प्रजनन संस्थेवरही मोठा परिणाम होण्याचा धोका आहे. शिवाय या घातक रासायनिक पदार्थांमुळे हृदयरोग, मेंदूचे विकार, मधुमेह आणि अर्भकाच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो, अशा निष्कर्षांचाही यामध्ये समावेश आहे.

दिल्लीस्थित टॉक्सिक लिंक अशासकीय संस्थेच्या वतीने (एनजीओ) याविषयी मेन्स्ट्रुअल वेस्ट-2022 या शीर्षकाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या संस्थेच्या वतीने रासायनिक (ऑर्गेनिक) आणि अजैविक (इनऑर्गेनिक) अशा दोन्ही प्रकारने बनविलेल्या बाजारातील 10 सॅनिटरी नॅपकिन्सचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये फथालेटस आणि काही घातक रासायनिक मूलद्रव्यांचा समावेश केला गेला असल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये पुढे आले.

महिलांच्या मासिक पाळीमध्ये निरोगी आणि स्वच्छतेसाठी सॅनिटरी नॅपकिन्सचा जागतिक पातळीवर पुरस्कार केला जात आहे. यानुसार सर्वत्र सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याची मोहीम उघडण्यात आली.

शाळा-महाविद्यालयांमध्ये वेंडिंग मशिन्स बसवण्यात आली आणि त्याहीपुढे जाऊन महिलांना त्याचा वापर अत्यंत सुलभ व्हावा, यासाठी काही नव्याने सुविधा सॅनिटरी नॅपकिन्समध्ये पुरवण्यात आल्याच्या जाहिराती सर्वत्र दिसतात. अशा नॅपकिन्सची निर्मिती करताना सिंथेटिक प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. द्रवपदार्थ शोषून घेण्यासाठी आणि मऊपणाकरिता त्याचा वापर केला जात असला, तरी या प्रक्रियेत युरोपियन स्टँडर्डस्ने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात फथालेटस् वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याखेरीज सुमारे 25 घातक रसायनांचा वापर आणि त्यांचे प्रमाणही चिंताजनक असल्याचे या तपासणीचा निष्कर्ष आहे.

कर्करोगाबरोबर वंध्यत्वाचाही धोका

सॅनिटरी नॅपकिन्सच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये जे घातक रासायनिक पदार्थ वापरले जातात, त्या रासायनिक पदार्थांचा महिलांच्या प्रजनन संस्थेशी अधिक जवळचा संबंध येतो. या संस्थेद्वारे या पदार्थांचे शोषण अधिक गतीने मानवी शरीरामध्ये होते आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. यामध्ये कर्करोगाबरोबर वंध्यत्वाचाही धोका असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.

Back to top button