देशात रब्बीच्या लागवड क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्रावर गव्हाची लागवड? | पुढारी

देशात रब्बीच्या लागवड क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्रावर गव्हाची लागवड?

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : गव्हाची टंचाई, बाजारात दराचा चढता आलेख आणि निर्यातबंदीनंतर दरवाढ रोखण्यासाठी केंद्राने आयात शुल्कात कपात करून बाजारात गव्हाची विक्री खुली करण्याचा दिलेला इशारा आदी स्थित्यंतरांमुळे चिंता निर्माण झाली आहे. तथापि, रब्बीच्या पेरणीमध्ये यंदा गव्हाच्या लागवड क्षेत्रात 25 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 10 टक्क्यांची वाढ नोंदविली असून, हवामानाने अनुकूल साथ दिली, तर भारतीय धान्य बाजारासाठी गव्हाच्या विक्री उत्पादनाची एक सुखद बातमी असेल, असे अनुमान केंद्रीय पातळीवर काढण्यात येत आहे.

देशात सध्या रब्बीच्या पेरणीचा हंगाम जोरात सुरू आहे. रब्बी हंगामात प्रतिवर्षी सरासरी 64 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. 25 नोव्हेंबरपर्यंत देशात सरासरी 35.85 दशलक्ष हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. एकूण क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण 56.25 टक्के इतके आहे, गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 7.2 टक्क्यांनी वाढले आहे. 15.28 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड झाली आहे.

यंदा उत्तरेकडे समाधानकारक पाऊस झाला आणि सध्या घाऊक बाजारामध्ये उत्तर भारतात गहू प्रतिक्विंटल 2900 रुपये दराने विकला जात आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात गव्हाच्या लागवडीकडे वळल्याने केवळ हवामानाच्या साथीची तो प्रतीक्षा करत आहे. ही साथ चांगल्या पद्धतीने निभावली गेली, तर पुन्हा एकदा गव्हाच्या उत्पादनाचा विक्रम निर्माण होऊ शकतो.

Back to top button