कोल्हापूर : आणखी एका कंपनीचा पावणेदोन कोटींचा गंडा | पुढारी

कोल्हापूर : आणखी एका कंपनीचा पावणेदोन कोटींचा गंडा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीपाठोपाठ राजारामपुरी येथील ऑक्ट 9 इन्व्हेस्टमेंट सोल्यूशन कंपनीकडून फसवणुकीचा प्रकार चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली आहे. गुंतवणुकीच्या रकमांवर दरमहा 8 टक्के बोनस आणि दीड वर्षानंतर मूळ रक्कम परत देण्याच्या आमिषाने शहरासह जिल्ह्यातील 60 पेक्षा अधिक गुंतवणूकदारांची 1 कोटी 76 लाख 80 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी कथित कंपनीच्या तीन संचालकांविरुद्ध शनिवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित ज्योती नागावकर (वय 35, रा. अयोध्या पार्क, कोल्हापूर), कृष्णात नंदा चौगुले (रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ), नामदेव विठ्ठल माळी (रा. मणेर मळा, ता. करवीर), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. संचालकांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.

राजारामपुरी तिसरी गल्ली येथील सरूडकर कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमधील कार्यालयात जानेवारी 2021 ते आजअखेर हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. बोनसची रक्कम आणि मूळ मुद्दल परत करण्यास संचालकांनी नकार दिल्याने संतापाची लाट पसरली आहे. बांधकाम व्यावसायिक सचिन दत्तात्रय बारड (रा. आयशोलेशन हॉस्पिटल रोड, कोल्हापूर) यांनी कंपनीच्या संचालकांनी स्वत:ची 7 लाख 50 हजार रुपयांसह अन्य 60 पेक्षा अधिक जणांची 1 कोटी 76 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.

गुंतवणुकीसाठी सेबी, आरबीआयची परवानगी घेतल्याचे भासविले!

संशयितांनी राजारामपुरी परिसरात ऑक्ट 9 इन्व्हेस्टमेंट सोल्यूशन (एल.एल.पी.) कंपनी दोन वर्षांपूर्वी स्थापन केली. सेबी व आरबीआयकडून गुंतवणूक करण्याचे सर्व परवाने घेतले असल्याचे खोटे सांगून संशयितांनी तक्रारदार बारड व गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 8 टक्के दराने कमिशन व 18 महिने पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत देण्याचे आमिष दाखविले होते.

आमिषाला बळी पडून गुंतवणूक

संचालकांच्या फसव्या आमिषाला बळी पडून शहरासह जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी लाखो रुपये गुंतविले. संशयितांनी बनावट करारपत्र तयार करून ते नोटरी केले. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून ठरल्याप्रमाणे बोनस व मुद्दल परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

रात्री उशिरा संशयितांच्या घरांची झडती!

बारड यांच्यासह 60 गुंतवणूकदारांनी फिर्याद दाखल करताच राजारामपुरी पोलिसांच्या पथकाने कार्यालय गाठले. मात्र, कार्यालयाला टाळे ठोकल्याचे निदर्शनास आले. संशयितांच्या घरांचीही रात्री उशिरा झडती घेण्यात आली. मात्र, संशयित सापडले नसल्याचे तपासाधिकारी ओमासे यांनी सांगितले.

गुंतवणुकीची रक्कम

कंपनीत गुंतवणूक झालेल्या व्यक्तींची नावे व कंसात गंतवणुकीची रक्कम : सागर चोपडे (2 लाख 50 हजार), विशाल मोहिते (4 लाख), अमृता काटकर (1 लाख 50 हजार), अमर बसरेगर (2 लाख), अनिकेत कळंबेकर (5 लाख), लक्ष्मण पाटील (2 लाख), गोमजी पाटील (1 लाख) अमित माने (5 लाख), अतुल कोळेकर (4 लाख 50 हजार), नितेश पाटील (1 लाख), प्रशांत निवळे (1 लाख 50 हजार), रोहन पाटील (2 लाख 50 हजार), सादिक मुल्ला (7 लाख 50 हजार), मेघा पोळ (1 लाख), विजयकुमार संकीली (1 लाख), आशिष काटे (1 लाख), रवींद्र पाटील (2 लाख 50 हजार), शोभा यादव (1 लाख 50 हजार), प्रवीण दाभाडे (5 लाख 50 हजार), संगीता रायकर (4 लाख), नितीन वाघमारे (3 लाख), शहाजी कांबळे (5 लाख), अभिजित पाटील (11 लाख) यांचा प्रामुख्याने समावेश आहे, असेही पोलिस निरीक्षक ओमासे म्हणाले.

Back to top button