कोल्हापूर : विद्यार्थी रमले जागतिक वारशांच्या अनोख्या दुनियेत | पुढारी

कोल्हापूर : विद्यार्थी रमले जागतिक वारशांच्या अनोख्या दुनियेत

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  पुरातन वस्तू, शस्त्रे, मातीची भांडी, हस्तीदंतावरील कोरीव काम, शिल्पे यातून मानवी जीवनातील अनेक स्थित्यंतरे समोर येतात. कोल्हापूर घडविणारे राजर्षी शाहू महाराज, कलानगरीचा वारसा जपणार्‍या चित्रांतून करवीरनगरीचा देदीप्यमान इतिहास शेकडो विद्यार्थ्यांनी अनुभवला. ‘जागतिक वारसा सप्ताहा’निमित्त दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयअंतर्गत कोल्हापूर वस्तुसंग्रहालय व प्राथमिक शिक्षण समिती यांच्या वतीने वस्तुसंग्रहालय भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापूर व परिसरातील 25 शाळांच्या सहभागातून कोल्हापूर वस्तुसंग्रहालय (टाऊन हॉल), राजर्षी शाहू जन्मस्थळ – लक्ष्मी विलास पॅलेस, चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय, राजारामपुरी याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी हा उपक्रम सुरु झाला. दै.‘पुढारी’चे सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे , विजय माळी, उषा सरदेसाई उपस्थित होत्या.

वारसा जपणारी वस्तुसंग्रहालये…

कसबा बावडा परिसरात राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेसची हेरिटेज वास्तू उभी आहे. शाहू छत्रपतींचा जीवनपट उलगडणार्‍या छायाचित्रांसह पुतळ्यांमध्ये साकारलेला राज्याभिषेकाचा प्रसंग, संस्थानकालीन मोतीगज हत्ती प्रतिकृती, ऐतिहासिक नांगर याची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

कोल्हापूर वस्तुसंग्रहालय

कोल्हापुरात पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननातील अवशेष वस्तुरूपात या ठिकाणी जतन करण्यात आले आहेत. शस्त्र, शिल्पाकृती, शिलालेख, लाकडावरील कोरीव काम या स्वरूपात वस्तुसंग्रहालयाची रचना आहे. राजारामपुरी येथील चंद्रकांत मांडरे संग्रहालय कलाविश्व व चित्रपटसृष्टीच्या अनोख्या मिलाफाची साक्ष देते. या ठिकाणी सिनेकलाकार चंद्रकांत मांडरे यांच्या जलरंग, तैलरंगामध्ये साकारलेल्या विविध चित्रांचा ठेवा जपण्यात आला आहे. वस्तुसंग्रहालयस्थळी साहाय्यक अभिरक्षक उदय सुर्वे, उत्तम कांबळे, अर्चना शिंदे, आदित्य माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Back to top button