कोल्हापूर : तब्बल 50 वर्षांनंतर कोगे बंधार्‍याची दुरुस्ती | पुढारी

कोल्हापूर : तब्बल 50 वर्षांनंतर कोगे बंधार्‍याची दुरुस्ती

कोल्हापूर; सुनील सकटे :  कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांमुळे छोट्या छोट्या शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी मिळाले. त्यांना आर्थिक सुबत्ता मिळाली; मात्र हेच बंधारे आता जर्जर झाले आहेत. अशाच प्रकारचा भोगावती नदीवरील कोगे बंधारा खिळखिळा झाला असून जलसंपदा विभागाने पुढाकार घेऊन या बंधार्‍याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. विशेष म्हणजे, तब्बल 50 वर्षांनी या बंधार्‍याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे.

राजर्षी शाहू छत्रपती यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या केटी वेअरमुळे जिल्ह्यातील शेतीला बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. राजर्षी शाहू छत्रपतींच्या दूरद़ृष्टीमुळे जिल्हा सुजलाम् सुफलाम् बनला आहे; मात्र जिल्ह्यातील अनेक केटी वेअरच्या दुरुस्तीची नितांत गरज आहे. जलसंपदा विभागाने वेळोवेळी दुरुस्तीचे काम हाती घेऊन अनेक बंधार्‍यांचे अस्तित्व कायम राखले आहे. अशाच पद्धतीने कोगे बंधार्‍याची दुुरस्ती सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कोल्हापूर शहरास पाणीपुरवठा करावा लागत असल्याने आणि कोगे बंधार्‍याच्या पुढील बंधार्‍यातून पाणी सोडणे आवश्यक असल्याने बंधारा दुुरस्तीस मर्यादा येतात. त्यामुळे तब्बल 50 वर्षांनंतर या बंधार्‍याची दुरुस्ती होत आहे. जलसंपदा विभागाने यंदा हे काम हाती घेतले आहे. टप्प्याटप्प्याने काम सुरू करून बंधार्‍याची दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे. गेले आठ दिवस बंधारा दुरुस्तीचे काम सुरू आहे. या बंधार्‍याचे एकूण 33 खांब आहेत. दोन अबेटमेंट आहेत. 50 वर्षांनी या बंधार्‍याच्या वॉटर कटिंग बाजूला मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे.

जलसंपदा विभागाने या कामाची निविदा मंजूरही केली आहे. तब्बल 60 ते 70 लाखांचा निधी मंजूर आहे. या बंधार्‍याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; मात्र कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होउन शहरवासीयांची गैरसोय होऊ नये, याचीही खबरदारी घेऊन दुरुस्ती केली जात आहे. सध्या आठ दिवस दुरुस्ती सुरू होती. आता काम बंद केले आहे. पुन्हा चार दिवसांनी काम सुरू केले जाणार आहे. 14 खांब आणि कटवॉटरची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. बंधारा तळातून मजबूत करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता रोहीत बांदिवडेकर आणि शाखा अभियंता निरुखे यांनी सांगितले.

Back to top button