कोल्हापूर : गांधीनगर योजनेतील गावांची 13 कोटी थकबाकी | पुढारी

कोल्हापूर : गांधीनगर योजनेतील गावांची 13 कोटी थकबाकी

कोल्हापूर, डॅनियल काळे : शहरालगतच्या सर्व मोठ्या गावांना पाणीपुरवठा करणार्‍या गांधीनगरसह 13 गावांच्या प्रादेशिक योजनेची थकबाकी सुमारे 13 कोटी इतकी झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खर्चावर आधारित योजना करून योजनेचा सर्वच खर्च या गावांवर लादल्यामुळे जवळच्या कोल्हापूर शहरापेक्षाही दुपटीहून अधिक म्हणजेच प्रतिहजार लिटरला 20 रुपये इतका दर आकारल्याने ही थकबाकी वाढली आहे. थकबाकी भरणे या गावांच्याही आवाक्याबाहेर जात असल्याने वसुलीसाठी जीवन प्राधिकरणाकडून विविध युक्त्या केल्या जात आहेत. तरीदेखील योजनेत समाविष्ट गावाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

कोल्हापूर शहरालगतच्या आणि विशेषत: शहराच्या पूर्व आणि दक्षिण बाजूच्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी गांधीनगरसह 13 गावांसाठी ही योजना राबविण्यात आली. या 13 गावांपैकी नेर्ली आणि तामगाव या दोन गावांना सध्या एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ही दोन गावे सध्या गांधीनगर योजनेतून बाहेरच पडली आहेत. तरीदेखील पूर्वी काही वर्षे या गावांनी पाणी घेतल्यामुळे त्यांचीही नावे थकबाकीच्या यादीत आहेत.

अभय योजनेतून विलंब आकारात सूट

योजनेतील गावांची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने आणि त्यातही विलंब आकाराची रक्कम मोठी असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अभय योजना जाहीर करून विलंब आकारात सूट देण्याचे जाहीर केले होते. तथापि या योजनेला सरनोबतवाडी वगळता अन्य गावांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता या योजनेला मार्च 2023 पर्यंत सूट दिली असून गावांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अभियंता ए. डी. चौगुले यांनी केले आहे.

थकबाकी भरण्याची एकाही गावाची नाही कुवत

गांधीनगर योजनेतून लोकांना महागडे आणि अपुरे पाणी मिळाले. पाणीपुरवठा ग्रामीण निकषाप्रमाणे दरडोई दरदिवशी 55 लिटर याप्रमाणे होतो. पण पाणीपट्टी मात्र शहरापेक्षा दुप्पट इतकी आकारली. कोल्हापूर शहराचा प्रतिहजार लिटरचा दर हा 9 रुपये इतका आहे, तर गांधीनगर योजनेतील लोकांकडून 20 रुपये प्रतिहजारी लिटर इतक्या दराने पाणीपट्टी आकारली आहे. त्यामुळेच या थकबाकीचा बोजा गावांवर पडला असून इतकी मोठी थकबाकी भरण्याची कुवत एकाही गावाची नाही.

थकबाकीदार गावे (कंसात थकबाकी)

उजळाईवाडी : 4 कोटी 31 लाख 95 हजार 871
गोकुळशिरगाव : 41 लाख 95 हजार
सरनोबतवाडी : 4 लाख 25 हजार 946 रुपये
उचगाव : 3 कोटी 34 लाख 32 हजार 159
गडमुडशिंगी : 1 कोटी 52 लाख39 हजार 491
गांधीनगर : 1 कोटी 18 लाख 1732
वळीवडे : 69 लाख 5 हजार 602
कणेरी : 61 लाख 12 हजार
पाचगाव : 71 लाख 9300
नेर्ली : 5 लाख 49 हजार 639
तामगाव : 74 लाख 7 हजार 179

Back to top button