कोल्हापूर : मुदाळतिट्टा-आदमापूर रस्त्याचे काम कासवगतीने; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त | पुढारी

कोल्हापूर : मुदाळतिट्टा-आदमापूर रस्त्याचे काम कासवगतीने; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : देवगड- निपाणी मार्गावरील आदमापूर- मुदाळतिट्टा या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहने पलटी होणे, अडकणे यामध्ये वाढ झाल्याने प्रवासी वर्गाला वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवासी व व्यापारी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. देवगड- निपाणी या मार्गाचे काम मागील तीन वर्षापासून  सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अपुरी राहिली आहेत. त्यामुळे हा मार्ग अपघातप्रवण बनला आहे. या मार्गावरील मुदाळतिट्टा ते यमगे दरम्यानचा रस्ता काँक्रिटीकरण केला जात आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणी गटारी पूर्ण केल्या आहेत. तर काही ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटारीचे काम अर्धवट आहे.

मुदाळतिट्टा-आदमापूर दीड किलोमीटर अंतराचा रस्ता तर चांगलाच चर्चेत आला आहे. या रस्त्याच्या कामाला दोन महिन्यापूर्वी सुरूवात होऊनही काम अपूर्ण अवस्थेतच आहे. त्यामुळे  सध्या वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. आदमापूर येथील बाळूमामा मंदिराकडे येणारा भाविक वर्ग, ऊस वाहतूक आणि इतर वाहतुकीमुळे मोठी कोंडी होत आहे. एका बाजूने रस्त्याचे काँक्रिटीकरण करत असताना दुसऱ्या बाजूचा रस्ता खुदाई करून ठेवला आहे. काही ठिकाणी मध्येच खुदाई करून दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण करून घेतले आहे. तर  गटारी बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खुदाई करण्यात आली आहे. या अडचणीमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागून राहतात.

आदमापूर -मुदाळतिट्टा दीड किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी पाऊण तासाचा कालावधी लागत आहे. वाहतुकीचा रस्ता असताना या रस्त्याचे काम काळजीपूर्वक केलेले नाही. बैलगाडीने ऊस वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात तारांबळ होत आहे. वाहने गटारामध्ये पलटी होणे, खुदाई केलेल्या ठिकाणी अडकणे, असे प्रकार दररोज घडत आहेत. काही छोटे-मोठे अपघाती होत आहेत. ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या गटारीचे बांधकाम केले आहे. त्या ठिकाणी गटारामधील घाण काढण्यासाठी ठेवण्यात आलेल्या जागेवर संरक्षक पट्टी बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरूम, खडी, माती पडल्याने पाणी निचरा करण्यासाठी बांधण्यात आलेली गटारी आत्ताच तुंबली आहेत. दरम्यान, हा मार्ग त्वरित पूर्ण न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी वर्गाने दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button