

पुढारी ऑनलाईन डेस्क : बँकेतल्या लांबच लांब रांगांचा त्रास याआधी लोकांना होत असायचा. एटीएममशीनची सेवा सुरु झाली आणि बँकेवरील ताण कमी होऊ लागला. पण, सध्या काही लोक एटीएम मशीनमधून मिळत असणाऱ्या फाटक्या नोटांमुळे वैतागलेले चित्र दिसून येत आहे. या फाटक्या नोटा पाहिल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणात बदलतात. अशा नोटा कित्येक ग्राहक, विक्रेता स्वीकारण्यास नकार देतात. (ATM)
मशीनमधून प्राप्त झालेल्या फाटक्या नोटा चालवणार कुठे हा पहिला प्रश्न संबंधित व्यक्तीसमोर उभा राहतो. जर ही रक्कम मोठी असेल तर बँकेत ही बदलून मिळणार का हा दुसरा प्रश्न, सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्कम जर एखाद्या महत्त्वाच्या कामाकरिता काढली असेल तर ऐनवेळी पैशांची जमवाजमव कोठून करायची हा मोठा प्रश्न; पण अशावेळी घाबरण्याचे काहीच गरज नाही. या सर्व फाटक्या नोटा लगेचच बँकेत जाऊन त्या बदलून घऊ शकतो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत. (ATM)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ATM मधून मिळालेल्या फाटक्या नोटा बदलण्यासाठी नियम केले आहेत. या नियमांनुसार, बँक एटीएममधून वितरीत झालेल्या फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही मोठ्या प्रक्रियेतून जावे लागत नाही.
जुलै 2016 मध्ये रिझर्व्ह बँकेने एका परिपत्रकात म्हटले होते की, जर कोणत्याही बँकेने खराब नोटा बदलून घेण्यास नकार दिला तर संबंधित बँकेवर 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल. 'एटीएम'मधून सदोष किंवा बनावट नोट बाहेर पडल्यास त्याची जबाबदारी बँकेची असेल. नोटेमध्ये काही दोष आढळल्यास बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याची चौकशी करावी. नोटेवर अनुक्रमांक, महात्मा गांधींचा वॉटरमार्क आणि गव्हर्नरची शपथ दिसल्यास बँकेला कोणत्याही परिस्थितीत नोट बदलून द्यावी लागेल.
फाटलेल्या नोटांबाबत रिझर्व्ह बँक वेळोवेळी परिपत्रके जारी करत असते. अशा नोटा कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात सहजपणे बदलून मिळू शकतात. या नोटा बदलण्यासाठी एक निश्चित मर्यादा आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलू शकते. या नोटांचे एकूण मूल्य ५००० रुपयांपेक्षा जास्त नसावे. तथापि, खराबपणे जळलेल्या, फाटलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकत नाहीत. अशा नोटा रिझर्व्ह बँकेच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा केल्या जाऊ शकतात.
एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी सर्व प्रथम ज्या बँकेच्या एटीएममधून नोटा बाहेर आल्या त्या बँकेत जावे लागेल. तिथे एक अर्ज लिहावा लागेल. ज्यामध्ये पैसे कुठून काढण्यात आले याची तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहिती लिहावी लागेल. यानंतर अर्जासोबत एटीएममधून ट्रान्झॅक्शन संबंधित स्लिपही जोडावी लागेल. जर स्लिप जारी केली नसेल, तर मोबाईलवर प्राप्त झालेल्या व्यवहाराचा तपशील द्यावा लागेल. यानंतर तुमच्या नोटा बँकेद्वारे बदलल्या जातील.
हेही वाचा