कोल्हापूर : कोडोली-बोरपाडळे मार्गावर गॅस टँकर पलटी; गॅस गळतीमुळे मार्गावरील वाहतूक बंद | पुढारी

कोल्हापूर : कोडोली-बोरपाडळे मार्गावर गॅस टँकर पलटी; गॅस गळतीमुळे मार्गावरील वाहतूक बंद

बोरपाडळे; पुढारी वृत्तसेवा : कोडोली-बोरपाडळे मार्गावर बोरपाडळे गावाजवळ गॅस टँकरवरील चालकाचा ताबा सुटून टँकर पलटी झाला. टँकर पलटी झाल्याने टाकी लिकेज होऊन, यातून गॅस गळती सुरू झाली. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कोडोली ते बोरपाडळे हा मार्ग कोडोली पोलिसांकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

पन्हाळा आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी काल रात्रीपासूनच तैनात करण्यात आले आहेत. तरी पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. याठीकाणी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे सांगण्यात येत आहे.

गॅसने भरलेला टँकर जयगडहून नागपूरला जात होता. दरम्यान बोरपडळे गावालगत भूपाचीतळी कमानीजवळ गॅस टँकरच्या चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. या अपघातात गॅस टँकर पलटी होऊन, गॅस गळती सुरू झाली. यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करत, परिसरातील सुमारे तीनशे मीटरपर्यंत असलेली सर्व हॉटेल, दुकाने, बंद करण्यात आले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच पन्हाळाचे तहसीलदार रमेश शेंडगे, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, जिल्हा आपत्ती व्यवस्थानचे कर्मचारी, दोन क्रेन, कोल्हापूर व पन्हाळा येथील अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. तसेच या परिसरात घरात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरीत केल असून घरातील चुली पेटवण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे. बोरपाडळे गावचे सरपंच, ग्रा. प. सदस्य, पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष घटनस्थळी आहेत.

हेही वाचा:

Back to top button