Kolhapur Ambabai : अंबाबाई मंदिरात आढळला यादवकालीन शिलालेख | पुढारी

Kolhapur Ambabai : अंबाबाई मंदिरात आढळला यादवकालीन शिलालेख

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : इसवी सनाच्या १२ व्या शतकातील यादवकालीन शिलालेख मंगळवारी करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरात आढळला आहे. मंदिर प्राकारातील सरस्वती देवीच्या प्रदक्षिणा मार्गातील पूर्व भिंतीत हा शिलालेख आहे. संस्कृत भाषेतील देवनागरी लिपीतील हा शिलालेख कालौघात मंदिरातील अंतर्गत बदलांमध्ये भींतीत दगडी वीट म्हणून वापरण्यात आला आहे. (Kolhapur Ambabai)

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मंदिर परिसरातील मुळ स्थापत्य, इतिहासकालीन मूर्ती, वास्तू व तत्सम वास्तूंच्या जतन-संवर्धन-संरक्षणाचे काम सात्तत्याने सुरु आहे. या अंतर्गत मंदिराच्या मुळ दगडी स्थापत्यावर लावण्यात आलेली संगमरवरी फरशी काढण्याची मोहिम टप्प्या-टप्प्याने राबविली जात आहे. या मोहिमे अंतर्गत सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गातील पूर्व भिंतीची पाहणी करताना हा शिलालेख धर्मशास्त्र मार्गदर्शक तथा सहव्यवस्थापक गणेश नर्लेकर-देसाई यांच्या निदर्शनास आला. मूळ मंदिराचा भाग असलेल्या या शिलालेखाचा नंतर दगडी बांधकामात आडवा दगड म्हणून भिंतीत वापर करण्यात आला आहे. शिलालेखाची माहिती मिळताच देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी पाहणी केली. (Kolhapur Ambabai)

मंदिर इतिहासाचा आणखी एक अस्सल पुरावा

करवीर निवासीनी अंबाबाई मंदिराच्या इतिहासाचा आणखी एक अस्सल पुरावा या शिलालेखाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. यापूर्वी मंदिरात नवगृह मंदिरासमोरील (अष्टदिक्पाल मंडप) खांबावरील शिलालेख, निंबरसचा हळेकानडी लिपीतील शेषशाई मंदिरातील शिलालेख, यादवकालीन गजेंद्र लक्ष्मीजवळील शिलालेख, गारेचा गटपती मंदिर परिसरातील सिंगनेदव यादव कालीन महाद्वाराचा शिलालेख आदी शिलालेख प्रकाश झोतात आल्याची माहिती नेर्लेकर-देसाई यांनी सांगितली.

असा आहे शिलालेख…

अंबाबाई मंदिराच्या प्रासादातील सरस्वती मंदिराच्या प्रदक्षीणा मार्गावरील पूर्व भींतीत सापडलेला शिलालेख सुमारे २ फूट लांब व १ फूट रुंद आहे. संस्कृत भाषा व देवनागरी लिपीतील या शिलालेखावर एकूण १६ ओळी आहेत. गध्देगाळ किंवा गद्धेगाळी शिलालेख शापा-आर्शिवादात्मक, दानपत्र स्वरुपातील आहे. या शिलालेखाचे पुरातत्वीय पध्दतीने ईपीग्राफ (छाप) घेवून त्याचे वाचन व भाषांतर करून त्यावरील माहिती जाहिर केली जाईल, अशी माहिती धर्मशास्त्र मार्गदर्शक तथा इतिहास संशोधक गणेश नर्लेकर-देसाई यांनी दिली.

हेही वाचा;

Back to top button