कोल्हापूर : खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची आज पर्वणी | पुढारी

कोल्हापूर : खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची आज पर्वणी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : चालू वर्ष 2022 मधील दुसरे खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची पर्वणी मंगळवारी (दि.25) खगोलप्रेमींना मिळणार आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणार्‍या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणार्‍या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. या वर्षांतील दुसरे खंडग्रास सूर्यग्रहणाची सुरुवात 25 ऑक्टोबर दुपारी 4 वाजून 57 मिनिटांपासून होणार आहे. 5 वाजून 46 मिनिटांनी सर्वात जास्त म्हणजे 0.303 एवढा ग्रहणाचा आवाका म्हणजेच 30.3 टक्के सूर्याचा भाग ग्रासलेला पाहता येईल. संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी सूर्य ग्रासलेल्या अवस्थेतच अस्त पावेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी ग्रहण पूर्णपणे संपलेले असेल.

खंडग्रास सूर्यग्रहण भारतासह युरोप, उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व व आशियाच्या पश्चिम भागातून दिसणार आहे. अंदमान व निकोबार बेटे, ईशान्य शहरे आयझॉल, दिब—ुगड, इम्फाळ, इटानगर, कोहिमा, सिबसागर, सिलचर, तामेलाँग इत्यादींसह देशाच्या काही पूर्वेकडील भागांमधून हे ग्रहण दिसणार नाही.

सूर्यग्रहण नेहमी चंद्रग्रहणाच्या दोन आठवडे आधी किंवा नंतर होते. 8 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातून खंडग्रास चंद्रग्रहण पाहता येणार आहे. भारतातून दिसणारे पुढील सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी दिसणार आहे. ते खग्रास सूर्यग्रहण असेल; परंतु भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण म्हणून दिसेल अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली.

अंधश्रद्धा न बाळगता सावधपूर्वक सूर्यग्रहणाचे निरीक्षण करा

सूर्यग्रहण पाहताना सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी किंवा दुर्बीण, भिंगे रंगीत किंवा काजळी लावलेले काचेचे तुकडे, एक्स-रे फिल्म, सीडी आणि गॉगलमधून पाहू नये. डिजिटल कॅमेरा किंवा मोबाईलने फोटो घेताना ग्रहण पाहण्याच्या फिल्टरचा वापर करावा; अन्यथा सीसीडी सेन्सर खराब होण्याची शक्यता असते. ग्रहण पाहण्याकरिता विशिष्ट कागदापासून तयार केलेले सूर्यग्रहण पाहण्याचे चष्मे किंवा फिल्टर वापरावेत. सूर्यग्रहणावेळी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता सावधपूर्वक खंडग्रास सूर्यग्रहणाचे निरीक्षण करावे आणि वैज्ञानिक माहितीची देवाणघेवाण करावी, असे आवाहन डॉ. व्हटकर यांनी केले आहे.

Back to top button