कोल्हापूर : साडेतीन हजार बचत गटांना 88 कोटी अर्थसहाय्य | पुढारी

कोल्हापूर : साडेतीन हजार बचत गटांना 88 कोटी अर्थसहाय्य

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : चालू आर्थिक वर्षामध्ये आजअखेर जिल्ह्यातील 3 हजार 662 महिला बचत गटांना 88 कोटींचे कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर्षी 8 हजार 600 बचत गटांना 211 कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिलांना सक्षम बनविण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याकरिता समुदाय संसाधन व्यक्ती, बँकसखी, आर्थिक साक्षरता सखी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये महिला बचत गटांना मदत केली जाते. त्यामुळे दरवर्षी महिला बचत गटांची संख्या वाढत आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू झाले त्यावर्षी 2019-20 मध्ये महिला बचत गटांची संख्या 4 हजार 442 इतकी होती. दरवर्षी बचतगटांच्या संख्येत वाढ होताना दिसते. गेल्या तीन वर्षांत 20 हजार 765 महिला बचत गटांना 342 कोटींचे अर्थसहाय उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी सार्वजनिक बँका, खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका व सहकारी बँकांनी मदत केली आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड व्हावी याकरिता बँक साक्षर सखींकडून प्रयत्न केले जाते. या बँक सखींना राज्य प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येते.

महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीने दरवर्षी ताराराणी महोत्सव भरविण्यात येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. राज्य सरकारच्या निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा महोत्सव होऊ शकला नाही. यावर्षी हा महोत्सव होईल, अशी अपेक्षा होती. परंतु शासनाने अद्याप त्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शविलेली नाही. त्यामुळे यावर्षीचा महोत्सव देखील होण्याची शक्यता कमी आहे.

महिला बचत गटाच्या वतीने घेण्यात कर्जाची नियमित परतफेड केली जाते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात कमी केवळ दोन टक्के थकीत कर्जाचे प्रमाण आहे, असे प्रभारी प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी सांगितले.

Back to top button