तिरुपती देवस्थानकडून कोल्हापुरात अन्नछत्र, भक्त निवास व्हावे | पुढारी

तिरुपती देवस्थानकडून कोल्हापुरात अन्नछत्र, भक्त निवास व्हावे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : तिरुपती दर्शनानंतर भाविक-पर्यटक करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात मोठ्या संख्येने येतात. या भाविक-पर्यटकांसाठी तिरुमला तिरुपती देवस्थानकडून कोल्हापुरात अन्नछत्र व भक्त निवासाची सुविधा निर्माण करावी. यासाठीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच तिरुपती येथेही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून भक्त निवास सुरू करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी, यासह विविध सूचना आणि एकूणच धार्मिक पर्यटन विकासाबाबतची चर्चा दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी तिरुपती ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांशी केली.

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट (टी.टी.डी.) तर्फे गुरुवारी करवीर निवासिनी अंबाबाईला शालू अर्पण करण्यात आला. यानंतर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ट्रस्टचे चेअरमन वाय. व्ही. सुब्बारेड्डी, सौ. सुवर्णाम्मा सुब्बारेड्डी, हेमी रेड्डी प्रशाती, टी.टी.डी.चे सदस्य सौरभ बोरा, सदस्य व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर, तिरुपती देवस्थानचे मुख्य पुजारी व्यंकटेश स्वामी, सदस्य के. रामाराव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लक्ष्मीनिवास बियाणी, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, शिवसेनेचे कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, शैलेश बांदेकर हेही उपस्थित होते.

सर्वांचे स्वागत व आदरसत्कार डॉ. प्रतापसिंह जाधव व सौ. गीतादेवी जाधव यांनी करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती, शाल, श्रीफळ, साडी देऊन केला. यानंतर डॉ. जाधव यांनी तिरुपती ट्रस्टच्यावतीने सुरू असणार्‍या विविध विकासकामांची माहिती घेतली. तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माध्यमातून कोल्हापुरात सुरू असणार्‍या विविध योजनांची माहिती दिली. तिरुपती व अंबाबाई मंदिराच्या माध्यमातून धार्मिक पर्यटन विकासासाठी मुबलक संधी उपलब्ध असून, या माध्यमातून स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात व्यवसाय उपलब्ध होणार आहे. याकरिता तिरुपती ट्रस्ट व देवस्थान समितीच्या समन्वयाने विविध योजना भविष्यात राबविता येतील. यासाठी दोन्ही देवस्थानांच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करता येईल, अशा सूचनाही डॉ. जाधव यांनी केल्या.

तिरुपतीनंतर कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकरिता भक्त निवास व अन्नछत्र सुरू करावे, यासाठीची मागणी होत आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टने या जागेवर भक्त निवास व अन्नछत्र सुरू करावे. त्याचप्रमाणे कोल्हापुरातून तिरुपतीला जाणार्‍या भाविकांकरिता भक्त निवास उभारणीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला तिरुपती ट्रस्टने जागा उपलब्ध करून द्यावी, यासह विविध सूचनाही डॉ. जाधव यांनी केल्या. तिरुमला ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी हे दोन्ही प्रस्ताव अत्यंत चांगले असून, यावरील पुढील कार्यवाहीसाठी बैठक घेऊन चर्चा करू. यानंतर याच्या अंतिम निर्णयासाठी कोल्हापूर किंवा तिरुपती येथे व्यापक बैठक घेऊ, अशी ग्वाही दिली.

Back to top button