कोल्हापूर : इंधन सुरक्षिततेसाठी भारताने शोधला नवा पुरवठादार!

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : देशाची इंधन सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी भारतातील दुसर्‍या क्रमांकाची ऑईल कंपनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने ब्राझीलमधील पेट्रोब्रास या कंपनीबरोबर नुकताच सामंजस्य करार केला आहे. यानुसार 20 लाख टन क्रूड ऑईल आयात केले जाणार आहे. ब्राझील सरकारने नुकताच रुपयाच्या चलनामध्ये व्यवहार करण्याचे घोषित केल्यामुळे इंधनाच्या उपलब्धतेसाठी भारताचे हे महत्त्वाचे पाऊल म्हणून ओळखले जात आहे.

जागतिक इंधनाच्या बाजारपेठेत भारत हा मोठा ग्राहक आहे. या बाजारात ऑईल कंपन्यांच्या दबावाने किमतीतील चढ-उताराचे मोठे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर जाणवत असतात. यासाठी निश्चित दरामध्ये क्रूड ऑईलच्या खरेदीचे दीर्घकालीन करार करण्याची पद्धत भारताने रूढ केली आहे. सध्याच्या बदलत्या भू-राजकीय (जिओ पॉलिटिकल) स्थितीमध्ये भारताला जागतिक बाजारात नवा स्रोत हाताळणे अनिवार्य ठरले होते. जेणेकरून पेट्रोल कंपन्यांचा क्रूड ऑईलवरील दबाव कमी करता येणे शक्य होते.

याद़ृष्टीने भारत सरकार गेले काही दिवस पाऊल टाकते आहे. यानुसार ब्राझीलियन ‘पेट्रोलिओ ब्राझीलेरो’ (पेट्रोब्रास) या कंपनीबरोबर 20 लाख मेट्रिक टन, तर कोलंबियामधील ‘इकोपेट्रोल’ या कंपनीबरोबर 10 लाख मेट्रिक टन क्रूड ऑईल उपलब्धतेचा करार पाईपलाईनमध्ये होता. यापैकी पेट्रोब्रासबरोबर नुकताच करार करण्यात आला. या करारावर बीपीसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुणकुमार सिंग आणि पेट्राब्रासच्या वतीने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅओ पेस दी अँड्रादे यांनी स्वाक्षर्‍या केल्या.

पेट्रोब्रास ही ब्राझीलमधील क्रूड ऑईल, नैसर्गिक वायू यांच्या क्षेत्रामध्ये बलाढ्य कंपनी समजली जाते. या कंपनीबरोबर क्रूड ऑईलच्या उपलब्धतेसाठी करार करताना बीपीसीएलची उपकंपनी असलेल्या भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेड या कंपनीने ब्राझीलमधील समुद्रातील तेल साठे शोधून क्रूड ऑईलचे उत्पादन घेण्यासाठी 1.6 बिलियन डॉलर्स (12 हजार 800 कोटी रुपये) गुंतवणुकीचा एक आराखडा तयार केला आहे. यातून या कंपनीला क्रूड ऑईलच्या उत्खननामध्ये हिस्सा मिळू शकतो.

परकीय भार कमी करण्याचा प्रयत्न

भारत सरकार इंधनाच्या आयातीवर खर्ची पडणारे परकीय चलन कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी देशात इथेनॉल व बायोडिझेल निर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे. इथेनॉल निर्मितीबरोबर इथेनॉलवर चालणार्‍या वाहनांच्या इंजिनचे तंत्रज्ञान उपलब्ध करण्यामध्ये भारताने ब्राझीलबरोबर करार केले आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या वापराने क्रूड ऑईलची वार्षिक आयात कमी करतानाच भारत पारंपरिक पुरवठादारांना बाजूला सारीत नव्या भू-राजकीय परिस्थितीचे अवलोकन करीत नवे पुरवठादार आणि स्रोत शोधत आहे. ब्राझीलबरोबरच करार हा याच प्रयत्नांचा एक भाग समजला जातो आहे.

Exit mobile version