कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात सुविधांची वानवा | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात सुविधांची वानवा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. दररोज सरासरी किमान दोन लाख भाविक दर्शन घेतात; पण या भाविकांना रस्ते, पार्किंग आणि स्वच्छतागृह यासारख्या मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन, पोलिस आणि महापालिका यांचे प्रयत्न अपुरे पडत असून त्यामुळे भाविकांची परवड होत आहे.

कोल्हापूरला येणार्‍या भाविक व पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मूलभूत सुविधांंमध्ये कधी वाढ होणार, हाच खरा प्रश्न आहे. भाविकांच्या सोयीसुविधांची चर्चा दरवर्षी केवळ नवरात्रौत्सव आला की सुरू होते. नवरात्रौत्सवात तात्पुरत्या पण त्याही तोकड्या सुविधा पुरविल्या जातात. नेटक्या आणि कायमस्वरूपी सुविधांबाबत कधीच ठोस पाऊल उचलले जात नाही. अंबाबाई मंदिराला केंद्रबिंदू ठेवून सुविधांसाठी प्रशासनाने निधीची तरतूद केली तरच काही प्रमाणात समस्या सोडविण्यास मदत होईल; पण त्यादुष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. रस्ते, पार्किंग, स्वछतागृहे या प्राथमिक सु?विधांचाही अभाव आहे.

महिला स्वछतागृहांची समस्या

दर्शनासाठी लांबून येणार्‍या भक्तांची आणि विशेषतः महिलांची स्वछतागृहाअभावी कुचंबणा होते. पाच ते सहा तासांचा प्रवास करायचा. पार्किंगपासून मंदिरापर्यंत मैलभर पायपीट करायची आणि कोणतीच सोय नसल्याने नानाप्रकारच्या अडचणींचा सामना करायचा, असे किती वर्षे चालणार, असा प्रश्न आहे. मंदिर परिसरात आणि वाहनतळाच्या ?ठिकाणीही स्वछतागृहांची कोणतीच सोय नाही. महिला स्वछतागृहांचा प्रश्न गंभीरच आहे. देवस्थान समिती आणि महापालिका काही फिरती शौचालये उपलब्ध करून देणार आहे; पण होणार्‍या गर्दीच्या तुलनेत ही सोय फारच अपुरी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वछता होते. याबाबतीत प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा. जी स्वछतागृहे उपलब्ध होतात, ती अस्वछ असतात. स्वछतेसाठी लक्ष द्यायला हवे, अशी लोकांची मागणी आहे.

वाहने लावायची तरी कुठे?

अंबाबाईला लाखो भाविक येतात; पण या परिसरात दोनशे वाहने बसतील एवढीही जागा पार्किंगसाठी उपलब्ध नाही. या परिसरात महापालिकेच्या ज्या काही मोकळ्या जागा होत्या, त्या जागा खासगी विकासकांच्या घशात घातल्या गेल्या. मंदिरालगत पार्किंगच्या दुष्टीने कधीही गांभीर्याने विचार केलेला नाही. त्यामुळे सध्यस्थितीत पार्किंग ही गंभीर समस्या आहे. सरस्वती टॉकीजवळ आता बहुमजली पार्किंगचे काम सुरू आहे. हीच काहीशी जमेची बाजू सोडली, तर पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीरच होत चालला आहे. दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंप, व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा अशा मैलभराच्या अंतरावर वाहने लावून भाविकांना पायपीट करावी लागते.

पॅचवर्क कितीवेळा करायचे?

शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. एकही रस्ता चांगला राहिलेला नाही; परंतु नवरात्रौत्सव काळात किमान अंबाबाई मंदिराकडे येणारे रस्ते तरी चांगले असावेत, ही भाविक आणि कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. अंबाबाई मंदिराकडे येणार्‍या प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहेत. वर्षानुवर्षे हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. कितीवेळा एकाच रस्त्यावरची पॅचवर्कची कामे करायची, असा प्रश्न आहे. उत्सव आला की, आदल्या रात्रीपर्यंत हे खड्डे बुजविणे आणि पॅचवर्क करणे अशी कामे सुरू असतात.

Back to top button