शानदार समारंभाला संस्मरणीय बनवणारे इव्हेंट मॅनेजमेंट : डॉ. योगेश जाधव | पुढारी

शानदार समारंभाला संस्मरणीय बनवणारे इव्हेंट मॅनेजमेंट : डॉ. योगेश जाधव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शानदार समारंभाला संस्मरणीय बनवण्याचे काम इव्हेंट मॅनेजमेंट करते, यामुळे उद्योगालाही चालना मिळत असल्याचे प्रतिपादन दै. ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी केले. दै. ‘पुढारी’, हॉटेल सयाजी इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशन (इमा) व टोमॅटो एफएम यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल सयाजी येथे ‘कोल्हापूर वेडिंग फेअर’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इमा’ संस्थेच्या लोगोचे अनावरण डॉ. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी आ. ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.

यावेळी डॉ. जाधव म्हणाले, लग्नाची जोडी ही स्वर्गात ठरते, पण प्रत्यक्षात लग्न पृथ्वीवर सत्यात उतरते. लग्नात भव्यदिव्य व वेगळेपणा आणण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पूर्वीच्या काळात लग्न समारंभ हे एक- दोन दिवसांचे असायचे, पण आता त्याचे स्वरूप बदलत चालले आहे. चार ते सात दिवसांपर्यंत लग्नसमारंभ चालतात. लग्नसराईत सजावट करायची की पै-पाहुण्यांचा पाहुणचार असा प्रश्न असायाचा, पण इव्हेंट मॅनेजमेंटमुळे हे सर्व सोपस्कर झाले आहे. इव्हेंटमुळेच डेस्टिनेशन वेडिंग ही नवीन संकल्पना रुजली असून ‘इमा’ संस्थेच्या माध्यमातून लग्नसमारंभ शानदारपणे साजरे होण्याला मदत होणार आहे.

आमदार ऋतुराज पाटील यांनी कोरोना काळात अर्थचक्र थांबले होते. कोणतेही समारंभ होत नव्हते. आता कोणताही समारंभ करताना इव्हेंटचे महत्त्व वाढले असून, कोल्हापूरच्या नावलौकिकात भर घालणारे इव्हेंट करावेत, असे सांगितले. ‘इमा’चे अध्यक्ष शिवप्रसाद पाटील यांनी स्वागत केले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय पाटील, कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांची भाषणे झाली. यावेळी ‘इमा’चे उपाध्यक्ष कुलदीप शिंगटे, सचिव नितीन पाटील, संग्राम घराळ, संग्राम नायक व असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. आभार राजेश शहा यांनी मानले. शनिवार व रविवार असे दोन दिवस हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

Back to top button