कोल्हापूर: झापाचीवाडी भरला, धामणी प्रकल्प कधी होणार ? | पुढारी

कोल्हापूर: झापाचीवाडी भरला, धामणी प्रकल्प कधी होणार ?

म्हासुर्ली: दिगंबर सुतार: झापाचीवाडी (ता. राधानगरी) येथील लघुपाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत आहे. पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून पाणीसंचय होणारा हा धामणी खोऱ्यातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील हरितक्रांतीची सुरुवात झाली आहे. तब्बल २२ वर्ष रखडलेला धामणी मध्यम प्रकल्पातील शासकीय स्तरावरील सोपस्कारही पूर्ण झाल्याने हा प्रकल्प नव्याने उभारी घेणार असल्याचे चित्र आहे. पण प्रत्यक्ष काम सुरू होण्याकडे लोकांचे डोळे लागले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास धामणी खोऱ्यात हरितक्रांती होण्यास मदत होणार आहे.

प्रश्नांचा गुंता सोडवण्यात लोकप्रतिनिधींना यश

एकूणच धामणी खोऱ्यास आधारवड ठरू पाहणाऱ्या धामणी मध्यम प्रकल्पास सन २००० मध्ये सुरुवात झाली. दीर्घकाळ पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांच्या आशा उंचावल्या. धामणीतून आज पाणी येईल उद्या येईल या आशेवर  २२ वर्षे सरसर निघून गेलीत. पण पदरात पाणी पडलेच नाही. दरम्यानच्या काळात बुडीत अभयारण्य क्षेत्राचा प्रश्न, प्रकल्पबाधीत लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न, कथित सिंचन घोटाळ्याचा प्रमुख साक्षीदार असणारा हा प्रकल्प लोकांची अगतिकता पाहता आहे. हा प्रकल्प अधिक काळ रखडल्याने सुधारित प्रशासकिय मान्यता मिळवणे, त्याच बरोबरीने निर्माण होणारा निधीचा प्रश्न या एकूणच प्रश्नांबरोबर यातील जटील प्रश्नांचाही गुंता सोडवणे, हे शर्थीचे काम होते. विलंब जरी झाला तरी दरम्यानच्या काळात टप्याटप्याने या प्रश्नांचा गुंता सोडवण्यात लोकप्रतिनिधींना यश आले आहे.

प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ घळभरणी बरोबर काही तत्सम कामे बाकी आहेत. प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी मागील उन्हाळ्यात १२० कोटींची फेरनिविदा प्रसिद्ध होत प्रकल्प कामाला प्रदीर्घ खंडानंतर उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रकल्पाचे काम दुसऱ्या ठेकेदाराकडे वर्ग झाले असून प्रत्यक्ष काम चालू होण्याकडे लोकांच्या नजरा लागून आहेत. तुर्तास हा प्रकल्प पूर्ण झाल्यास नदी बारमाही वाहती राहून एकूणच परिसरात हरितक्रांती बरोबर सर्वांगीण विकासाचा उदय होणार आहे.

* सन १९९६ मध्ये युती शासनाच्या काळात प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

* सन २००० मध्ये आघाडी शासनाच्या वतीने प्रत्यक्ष कामास सुरुवात

* सुरुवातीची दोन वर्ष काम झपाट्याने होत अर्धे अधिक काम पूर्ण

* त्यानंतर निर्माण झालेली प्रश्नांची मालिका प्रकल्पाच्या मुळावर

* साठवण क्षमता ३.८५ टीएमसी मूळ किंमत १२० कोटी, आजघडीस प्रकल्प किंमत ७८० कोटी.

* राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील सुमारे १४०० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ

लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांचा कस

बुडीत वनक्षेत्राच्या जटील प्रश्नांची सोडवणूक करून कामाला उभारी देण्यात पन्हाळा बावड्याचे तत्कालीन आमदार विनय कोरे तर प्रकल्पास भरीव निधी उपलब्ध करण्यात तत्कालीन सांगरूळचे आमदार पी. एन. पाटील यांनी अधिक प्रयत्न केले. माजी आमदार के. पी. पाटील, चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नाबरोबरच राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आणखी पाठपुराव्याची गरज आहे.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button