कोल्हापूर : शिवसेनेची निष्ठा हंडी शिवनेरी गोविंद पथकाने फोडली | पुढारी

कोल्हापूर : शिवसेनेची निष्ठा हंडी शिवनेरी गोविंद पथकाने फोडली

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : प्रचंड चुरस व उत्कंठा लागून राहिलेल्या मिरजकर तिकटी येथील शिवसेनेच्या निष्ठा हंडीवर शिवनेरी तरुण मंडळ तासगाव यांनी नाव कोरले. 32 फुटांवर सहा मानवी मनोरे रचत शिवनेरीचा 12 वर्षीय गोविंदा देवराज गणेश धनवडे याने दहीहंडीचा अचूक वेध घेत 1 लाख 1 रुपयाचे बक्षीस जिंकले. फटाक्यांची आतषबाजी, ‘जय भवानी, जय शिवाजी ’चा जयघोष करत तरुणाईने जल्लोष केला.

शिवसेनेच्या वतीने प्रथमच दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीला निष्ठेची दहीहंडी असे नाव देण्यात आले होते. दुपारी चार वाजल्यापासून या दहीहंडीकडे गोविंदा पथकांनी नोंदणी सुरू केली. शिवनेरी मंडळ तासगाव, नरसिंह गोविंद पदक कुटवाड, शिरेाळ, अजिंक्यतारा मंडळ शिरोळ व गोडी विहीर तालीम मंडळ शिरोळ, जय महाराष्ट्र मंडळ शिरोळ, गोल्डन क्लब शेडशाळ यांनी नोंदणी केली.

सर्वच गोविंदा पथकांनी पाच मानवी थरांची सलामी दिली. प्रारंभी रविकिरण इंगवले यांनी मिरजकर तिकटी येथे श्रीकृष्णाचे मंदिर आहे त्यासमोरच शिवसेनेची दहीहंडीचे आयोजन केले आहे. यावरून निष्ठावंतांना श्रीकृष्णाचा आशीर्वाद असल्याचे सांगितले. संख्येने पांडव कमी आहेत; पण श्रीकृष्णाची कृपा आमच्यावर असून, विजय निश्चित आहे, असे सांगितले.

प्रथम हंडी 40 फुटांवर होती. शिवनेरी व नरसिंह गोविंद पथकांमध्ये प्रचंड चुरस लागली होती; पण कोणत्याही पथकाला हंडीपर्यंत पोहोचता येत नव्हते. अखेर दोन-दोन फुटाने हंडीची उंची कमी केली. अखेर रात्री सव्वाअकरा वाजता शिवनेरीच्या गोविंदा पथकाने शिवसेनेची निष्ठा हंडी फोडली. विजयी गोविंदा पथकाला जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आर. डी. पाटील, शागंरधर देशमुख, महेश सावंत, सचिन चव्हाण, अर्जुन माने व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button