इचलकरंजी : गणेशमूर्ती विसर्जनावरून महापालिका-मंडळे संघर्ष पेटणार | पुढारी

इचलकरंजी : गणेशमूर्ती विसर्जनावरून महापालिका-मंडळे संघर्ष पेटणार

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीऐवजी शहापूर खणीमध्ये करण्याचा निर्णय इचलकरंजी महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, शहरातील विविध राजकीय पक्ष, संघटनांनी पंचगंगा नदीतच विसर्जनासाठी परवानगीची मागणी केली आहे. त्यामुळे गणेशमूर्ती विसर्जनावरून महापालिका प्रशासन आणि मंडळांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून शहरातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहापूर खणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र, शहापूर खणीमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी मिसळत असल्यामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. अशा परिस्थितीत या ठिकाणी मूर्ती विसर्जन केल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचाही मत प्रवाह आहे.

शासनाने गणेशोत्सवावरील अनेक निर्बंध उठवले आहेत. अशा परिस्थितीत विसर्जनासाठी पंचगंगा नदीचा पर्यायच योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, प्रशासनाने पंचगंगा नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी मूर्तींचे विसर्जन नदीमध्ये करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यावर्षी पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जनास प्रशासनाचा विरोध आहे. मात्र, काही राजकीय नेत्यांनी पंचगंगा नदीमध्येच मूर्ती विसर्जनाची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासन व राजकीय पक्ष यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दान केलेल्या मूर्तींबाबतही संभ्रम

नदी प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांकडून गणेशमूर्तींचे दान केले जाते. मात्र, दान करण्यात आलेल्या मूर्तींची योग्य व्यवस्था होते की नाही, याबाबत नागरिकांमध्ये आजही संभ्रम आहे. दान करण्यात आलेल्या मूर्तींचे विधिवत विसर्जन व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांची असते. त्याद़ृष्टीने प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणे आणि त्याबाबत नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.

Back to top button