इचलकरंजी : मुलांना शाळेत पाठवायचं कसं? | पुढारी

इचलकरंजी : मुलांना शाळेत पाठवायचं कसं?

इचलकरंजी ; विठ्ठल बिरंजे : फुटलेली कौले, उडालेले छत आणि पडझड झालेल्या चार भिंतीच्या आत यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. अशा धोकादायक शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कसे, असा प्रश्‍न पालकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने दुर्लक्ष केल्याने शाळांची अशी अवस्था झाली आहे.

सुसज्ज आणि देखण्या इमारती म्हणून इचलकरंजी महापालिकेच्या शाळांकडे पाहिले जात होेते; पण आता या शाळा म्हणजेच कोंडाळा होऊ लागला आहे. शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त पद्मावती शाळा नंबर 17 मधील विदारक चित्र समोर आले. शाळेच्या खोल्यांचे छत कोसळलेले आहे.

अडगळीचे साहित्य त्याच ठिकाणी आहे. व्हरांड्यातील कौले कधी डोक्यावर पडतील याचा नेम नाही, या स्थितीतच वर्ग भरविले जात आहेत. कलानगर येथील शाळा क्र. 14, सम—ाट अशोक नगरातील शाळा क्र. 12, 26, सेवासदन जवळील शाळा क्र. 16 आदी शाळांची अवस्था दयनीय आहे. अन्य 7 ते आठ शाळांचे निर्लेखन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही; मात्र तो प्रस्तावही का ‘पेंडिग’ ठेवलाय, यामागील ‘अर्थ’ अजूनही कुणासमोर आलेला नाही.

आणखी चार शाळांचे समायोजन

74 वर्ग बंद करून शाळांचे शेजारील शाळेत समायोजन झाले, तर आणखी चार ते पाच शाळांचे समायोजन करावे लागणार आहे. पटसंख्या आणि धोकादायक खोल्यांमुळे समायोजनाची वेळ आली आहे.

शाळांच्या आवारात मद्याच्या बाटल्यांचा खच

अनेक शाळांच्या आवारात मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. मद्यपींनी शाळेचे आवार हे ओपन बारच बनविले आहेत. सकाळी मुले शाळेत आल्यानंतर व्हरांडा स्वच्छतेवेळी दारूंच्या बाटल्या व गुटख्याच्या पुड्या गोळा करीत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

Back to top button