सत्ता बदलाचे गोकुळ, जिल्हा बँकेतही परिणाम दिसतील : धनंजय महाडिक | पुढारी

सत्ता बदलाचे गोकुळ, जिल्हा बँकेतही परिणाम दिसतील : धनंजय महाडिक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : सत्ता बदलाचे गोकुळ आणि जिल्हा बँकेतही परिणाम दिसतील, असा सूचक इशारा देत आमच्यापासून ज्यांनी फारकत घेतली ते आता पुन्हा संपर्क करत आहेत, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना मोठे यश मिळेल, चांगले उमेदवार निवडून येतील, असा आशावाद व्यक्त करत सगळं आम्हालाच मिळेल, असा ज्यांचा समज झाला होता, त्यांचा भ्रमनिरास होईल, असा टोलाही माजी पालकमंत्री सतेज पाटील यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

लोकसभेला माझा पराभव झाला. विधानसभेला अमल महाडिक पराभूत झाले. विधान परिषदही आम्हाला सोडावी लागली. गोकुळ आमच्या ताब्यातून गेले. तेव्हा आम्हीच सगळे आहोत, आम्हालाच सगळे मिळणार, असा काहींचा समज होता. महाडिक स्पर्धेबाहेर गेले, आता त्यांना कधीच गुलाल लागणार नाही, अशाही वल्गना केल्या. पण, आम्ही रणांगण सोडले नव्हते. भाजप आणि चंद्रकांत पाटील यांनी महाडिक कुटुंबीयांना संधी दिली. यानंतर आपल्याला गुलाल लागल्याचे सगळ्यांनी बघितले आहे. रणांगणात आणखी ताकदीने लढू असे यापूर्वीही आपण म्हणालो होतोच, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात सत्ता बदल झाला आहे. भाजप आणि नव्या शिवसेनेचे सरकार आले आहे. या सत्ताबदलाचा परिणाम गोकुळ आणि जिल्हा बँकेवरही होईल असे सांगत सत्ता नसताना आमच्यापासून ज्यांनी फारकत घेतली होती, ते आता संपर्क करत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीसह महापालिका निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षाचे अधिक उमेदवार विजयी होतील, चांगले यश मिळेल यासाठी आता तयारी सुरू केल्याचेही त्यानी सांगितले.

* लोकसभा निवडणुकीचे विरोधक, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आता सोबत आहेत, याबाबत विचारता, मंडलिक यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. आपल्याशीही त्यांची चर्चा झाली आहे. त्याचा तपशील आपण सांगू शकणार नाही. मात्र, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत त्यांच्याशी आपली आघाडी होऊ शकते. आपण त्यासाठी इच्छुक असल्याचेही खा. महाडिक यांनी सांगितले.

Back to top button