श्रेयवादात ‘इंटरेस्ट’ नाही; विकासात रूची : खासदार धनंजय महाडिक | पुढारी

श्रेयवादात ‘इंटरेस्ट’ नाही; विकासात रूची : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : मला श्रेयवादात अजिबात इंटरेस्ट नाही. मला विकासात रूची आहे. कोल्हापूर विमानतळप्रश्नी मीही पाठपुरावा केला आहे. सतेज पाटील यांनी माझेही नाव घेतले असते तर मलाही आनंद झाला असता, असे सांगत थेट पाईपलाईनप्रश्नी आणखी किती दिवाळींची वाट पाहायची, असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी केला.

कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधेला मंजुरी मिळाली. यावरून श्रेयवाद सुरू आहे, त्याबाबत विचारता खा. महाडिक म्हणाले, 15 वर्षे बंद असणारा विमानतळ आपण खासदार झाल्यानंतर सुरू केला. पाच विमानसेवा सुरू झाल्या. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्याचे प्रश्न प्रलबिंत होते. आपण पुन्हा खासदार झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून ते तत्काळ मार्गी लावले. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी विमानतळप्रश्नी तीन खासदारांची नावे घेतली. त्यांनीही प्रयत्न केले नाहीत, असे मी म्हणणार नाही. यामुळे कोल्हापूरचेच भले झाले आहे; पण पाठपुरावा केला, बैठका घेतल्या, पत्रव्यवहार केला असे तुम्ही म्हणता मग मंजुरी का आणली नाही, असा सवालही त्यांनी केला.

तुमची विकासकामे तुम्हीच करा

विरोधकांनी त्यांची विकासकामे घोषित करावीत, ती कामे त्यांनी करावीत, त्यात आम्ही सहभागी होत नाही, असे स्पष्ट करत खा. महाडिक म्हणाले, थेट पाईपलाईनचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे.त्यात आम्ही सहभाग घेणार नाही. त्याचे यश-अपयश हे त्यांचेच आहे. दिवाळीपर्यंत पाणी येईल असे सांगितले जाते. मात्र, किती दिवाळींपर्यंत वाट बघायची, असा सवालही त्यांनी केला.

कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला गती देणार

कोल्हापूर-वैभववाडी या कोकण रेल्वेला जोडणार्‍या मार्गाचे आपण खासदार असतानाच भूमिपूजन झाले होते. या मार्गालाही गती देणार असून, त्याची सद्यःस्थितीची माहिती मागविली आहे. ती प्राप्त होताच, संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली जाईल. हा मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे तो पूर्ण केलाच जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बास्केट ब्रिज होणार म्हणजे होणारच

कुठे आहे बास्केट ब्रिज, असा कुठं ब्रिज असतो काय, हवेत गेला काय, अशा प्रकारे विरोधक चर्चा करत राहिले; पण कोल्हापूरचा बास्केट ब्रिज होणार म्हणजे होणारच, असे स्पष्ट करत यामुळे भविष्यात कोल्हापूरची महापुरात रस्त्याची कनेक्टिव्हीटी तुटणार नाही, तो प्रश्न कायमचा मिटणार, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button