कोल्हापूर : यंदा होणार गोविंदांचा ‘जल्लोष’ | पुढारी

कोल्हापूर : यंदा होणार गोविंदांचा ‘जल्लोष’

कोल्हापूर : गौरव डोंगरे : कोरोनानंतर यंदा गोंविदा पथकेही दहीहंडीच्या तयारीत गुंतली आहेत. लाखांच्या घरात बक्षिसांची खैरात असणार्‍या दसरा चौक, गुजरी कॉर्नर, छत्रपती शिवाजी चौक, गंगावेश, राजारामपुरी येथील दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. दहीहंडी फोडणार्‍या गोविंदा पथकांसोबतच नृत्याविष्कारांचीही झलकही यावेळी पाहायला मिळणार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळतो. शहरातील मध्यवर्ती भागात प्रतिवर्षी हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी गर्दी उसळते. मात्र, 2019 चा महापूर आणि 2020 नंतर आलेल्या कोरोना लाटेमुळे दहीहंडी साध्या पद्धतीने साजरी झाली. सामाजिक भान जपताना या दहीहंडी मंडळांनी पूरग्रस्तांना मदत, कोरोना रुग्णांना मदतीचा हात दिला होता. यंदा मात्र गोपाळकाल्याची जोरदार तयारी शहरात सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुंबई, पुण्याचे नृत्य पथकांचे बुकिंग सुरू आहे.
नृत्य पथकांना मागणी

दहीहंडी फोडणार्‍या गोविंदांचा थरार यासोबतच अनेक मंडळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. या कार्यक्रमांसाठी मुंबईहून नृत्य पथकांना बोलाविण्यात येते. यंदाही अशा पथकांना मागणी असल्याचे सांगण्यात येत आहे.

लाखोंची बक्षिसे, सांस्कृतिक कार्यक्रम

दसरा चौकात युवा शक्तीची दहीहंडी तीन वर्षांनी साजरी होणार आहे. सुमारे 3 लाखांचे बक्षीस यासाठी असणार आहे. दसरा चौकातील हा दहीकाला सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून लोक येत असतात. गुजरीचा गोविंदाही यंदा जोरदार तयारी करीत आहे. दहीहंडी फोडणार्‍या गोविंदा पथकाला एक लाखाचे बक्षीस, सेलिबि—टींची उपस्थिती, बॉलीवूड डान्स ग्रुप, आकर्षक विद्युत रोषणाई ही वैशिष्ट्ये पाहायला मिळणार आहेत. शिवाजी चौकातही 1 लाख 11 अकरा हजारांची दहीहंडी असते. मुंबईहून येणार्‍या नृत्यपथकांचे सादरीकरण हे या मंडळाचे वैशिष्ट्य समजले जाते. ढोल-ताशा पथकांनाही यंदा बोलवण्यात आले आहे. लक्ष्मीपुरी धान्य मार्केट मंडळ, गोकुळ दूध संघातर्फे होणार्‍या दहीहंडीसाठी जिल्हाभरातील गोविंदा पथके हजेरी लावतात. राजारामपुरीमध्येही मागील काही वर्षांपासून लाखाची दहीहंडी सुरू करण्यात आली आहे. शिवाजी पेठेतील पंत अमात्य बावडेकर आखाडा येथे राधाकृष्ण मंदिर असून येथेही प्रतिवर्षी दहीहंडी परंपरा आहे. येथे स्थानिक तरुणांसह बाहेरील गोविंदा पथके उपस्थिती लावतात.

Back to top button