कोल्हापूर : सीपीआरमध्ये मृतदेह सडले | पुढारी

कोल्हापूर : सीपीआरमध्ये मृतदेह सडले

कोल्हापूर ; एकनाथ नाईक : गेल्या दहा दिवसांपासून सीपीआरच्या शवविच्छेदनगृहातील फ्रिजर बंद पडल्याने मृतदेह सडले आहेत. मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना सुरूच आहे. फ्रिजर दहा दिवस बंद असताना त्याकडे न पाहण्याचा अक्षम्य गलथानपणा इस्पितळाच्या प्रशासनाकडून घडला आहे. यामुळे नागरिकांतून संतप्त भावना आहेत.

कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकमधील रुग्ण मोठ्या संख्येने सीपीआरमध्ये येतात.शवविच्छेदनगृहात सहा मृतदेह ठेवण्यासाठी फ्रिजर आहे. तो गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे मृतदेह सडून दुर्गंधीमुळे कर्मचार्‍यांचा श्वास कोंडला आहे. फ्रिजर बंद असल्याचे कर्मचार्‍यांनी सीपीआर प्रशासनाला कळविले. मात्र, दहा दिवसांच्या काळात बंद पडलेला फ्रिजर दुरुस्त करण्याची गरज प्रशासनाला वाटली नाही.

अनेक कारणांमुळे शवविच्छेदनानंतर नातेवाईक येण्यास विलंब होतो. तेव्हा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवले जातात. बेवारस मृतदेहांची ओळख पटेेपर्यंत आणि पोलिसांची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत 72 तास मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवला जातो.

सध्या दोन बेवारस मृतदेह सडत आहेत. सोमवारी सकाळी मानवसेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका सडलेल्या बेवारस मृतदेहावर कदमवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

Back to top button