‘राधानगरी’ सेनेसमोर अस्तित्वाचे आव्हान | पुढारी

‘राधानगरी’ सेनेसमोर अस्तित्वाचे आव्हान

कौलव; राजेंद्र दा.पाटील : राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात उडी घेतल्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेसमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

राधानगरी मतदारसंघ हा पूर्वापार काँग्रेस व डाव्या विचारांची पाठराखण करणारा मतदारसंघ आहे. मात्र, नेहमीच संमिश्र कौल दिला आहे. काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, जनता दल व राष्ट्रवादी काँग्रेस सह शिवसेनेने दोनवेळा बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे के.पी.पाटील यांचे सलग दोन निवडणुकीतील वर्चस्व 2014 साली आमदार प्रकाश आबिटकर यांनी मोडून काढत सलग दोन वेळा शिवसेनेचा भगवा फडकावला आहे.2009 साली अपक्ष निवडणूक लढवून 36000 मते घेतलेल्या आबिटकर यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. ते जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असूनही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आबिटकरांसह कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी खदखदत होती.

आ.आबिटकर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांची पाठराखण केल्यामुळे मतदारसंघात शिवसेनेच्या अस्तित्वालाच सुरुंग लागला आहे. दोन्ही काँग्रेसमधील नाराजीचा फायदा उठवत आबिटकर यांनी स्वतःची ताकद निर्माण केली आहे. ष्ट्रवादीबरोबरच्या संघर्षातून झालेल्या त्रासामुळे बेजार झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या अद़ृश्य हाताने आबिटकरांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. या मतदारसंघात शिवसेनेच्या विचारांचा ठराविकच मतदार आहे.विशेषतः आजर्‍यापासून गगनबावड्याच्या सीमेपर्यंतच्या डोंगराळ टापूतील भूमिपुत्रांचे मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्य आहे. त्यांचे नातेवाईक हाच शिवसेनेचा मताधार आहे.आबिटकरांपूर्वी शिवसेनेने या मतदारसंघात दोनवेळा निवडणूक लढवली होती. मात्र, केवळ दहा-बारा हजार मतांपर्यंतच मजल गेली होती. त्यामुळे आबिटकर यांचे वर्चस्व अधोरेखित होते.

आबिटकर यांच्यापाठोपाठ खा.संजय मंडलिक यांनीही ठाकरे यांच्यापासून फारकत घेतली आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. मंडलिक पिता-पुत्रांच्या विजयात या मतदारसंघानेच चांगला हात दिला होता.त्यामुळे खा. मंडलिक यांच्या भूमिकेचा शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात पूर्वी डाव्या पक्षांची लक्षणीय ताकद होती. मात्र, आता ही पोकळी आबिटकर यांच्या रूपाने भरून निघाली आहे. मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील व माजी आमदार के.पी.पाटील यांच्या गटात विभागली गेली आहे. तर काँग्रेस पक्ष गटातटाच्या राजकारणामुळे कमकुवत झाला आहे. आमदारांचे पारंपरिक विरोधक राहुल देसाई यांनी कमळ हातात घेतले आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आबिटकरांसमोर एकास एक उमेदवार देताना दमछाक होणार आहे. आबिटकर यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदासह गोकुळची दोन संचालक पदे पटकावून सहकारात पाय रोवले आहेत.त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात महाविकास आघाडी व आबिटकरांदरम्यान संघर्ष रंगणार आहे.

Back to top button