नारायण राणेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज : राजेश क्षीरसागर | पुढारी

नारायण राणेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. मंत्रीपद देवून भाजपने केलेले उपकार फेडण्यासाठीच मंत्री राणेंच्या उचापती सुरु आहेत. केंद्रीय मंत्री पदाच्या नशेत असणाऱ्या राणेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते.

राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्‍हटले आहे की, शिवसेनेच्या कृपेने अनेक पदे भोगलेल्या मंत्री नारायण राणेंनी भाजपची लाचारी पत्करून शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. जो माणूस खाल्या मिठाला जागला नाही त्या माणसाची शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही.

राणे कुटुंबाच्या सत्तेच्या नशेची भूक अखंड महाराष्ट्र पाहत आहे. मंत्री नारायण राणेवर शिवसेनेने केलेले उपकार ते विसरले आहेत. निदान भाजपने केलेल्या उपकाराचे ऋण तरी त्यांनी फेडावे. पण, हे ऋण फेडताना जनसेवेची कामे त्यांनी करावी.

भाजप नेत्यांना खुश करण्यासाठी उठसुठ शिवसेनेवर टीका करायची हे वागणे बरे नवे. केंद्रीय मंत्री पदाची किंमत नारायण राणेंना समजत नाही. गल्लीतील गावगुंडांप्रमाणे त्यांची भाषा असेल तर त्यास तशाच पद्धतीने उत्तर देण्यास शिवसैनिक मागे हटणार नाहीत.

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री ठाकरे साहेब हे संयमी आणि शांत नेतृत्व आहे. त्यांना अशा टीका टिप्पणीपेक्षा जनसेवेची कामे करण्यात रस आहे.

पण, मंत्री राणे यांचे पद फक्त आणि फक्त शिवसेनेला विरोध करण्यासाठीच असून हा फरक जनता ओळखतेच. ज्या पक्षात राणे जातात तो डबघाईला येतो. त्यामुळे अशा अपशकुनी व्यक्तीचे पायगुण भाजपला लखलाभ. अशी टीकाही क्षीरसागर यांनी केली आहे.

काय म्हणाले होते राणे… 

‘किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे, हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला, किती चीड येणारी गोष्ट आहे.’ अशी टीका राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.

राणे यांच्यावर केवळ राजकीय सुडापोटी कारवाई : चंद्रकांत पाटील

राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकत नाही.

प्रत्येकाची एक स्टाइल असते. राणेंचीदेखील बोलण्याची एक स्टाईल आहे. त्यात द्वेष नाही. पण, केवळ राजकीय सुडापोटी राणेंवर कारवाई केली जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

‘अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही’

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळून येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

हेदेखील वाचा-

 

Back to top button