इचलकरंजी : महापालिकेतील कामचुकार अधिकार्‍यांचे धाबे दणाणले | पुढारी

इचलकरंजी : महापालिकेतील कामचुकार अधिकार्‍यांचे धाबे दणाणले

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील बेलगाम प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सोपवलेल्या जबाबदारीत हलगर्जीपणा केल्याबद्दल अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करीत आपल्या दबंगगिरी कामाची चुणूक दाखवून दिली आहे. कारवाईमुळे कामचुकार अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे. कारवाईचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे. मात्र राजकीय हस्तक्षेप, त्याचबरोबर वर्षानुवर्षे असलेली गटबाजी, खाबुगिरी रोखून महापालिकेतील कारभाराला शिस्त लावण्याचे आव्हान नूतन आयुक्तांसमोर आहे.

इचलकरंजी नगरपालिकेचे अनेक वर्षांच्या मागणीनंतर नुकतेच महापालिकेत रूपांतर झाले आहे. महापालिकेच्या 25 विभागांत तब्बल 1138 कर्मचारी कार्यरत आहेत. विविध अधिकार्‍यांसह कर्मचारी वर्षानुवर्षे महापालिकेत कार्यरत आहेत. राज्यातील श्रीमंत समजल्या जाणार्‍या पालिकेत राजकीय हस्तक्षेप व त्यानंतर अधिकारी, कर्मचार्‍यांची वाढत गेलेली मुजोरी, त्यापाठोपाठ भ—ष्ट कारभार आदींमुळे महापालिकेचा कारभार नेहमीच चर्चेचा विषय बनला होता.

महापालिकेचे आयुक्त आल्यानंतर कामकाजात सुधारणा होईल अशी अपेक्षा शहरवासीयांतून होती. त्यातच नवनियुक्त आयुक्त देशमुख यांनी अवघ्या काही आठवड्यातच कचरा डेपोतील कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत उपनगर अभियंता प्रवीण बैले यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून एकाच खुर्चीला चिकटलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना महापालिकेच्या कामकाजाचे वळण लागावे यासाठी त्यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे धाडसही देशमुख यांनी दाखवले आहे.

यापूर्वीही अनेकवेळा पालिकेत कारवाई करण्यात आल्या. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना खो बसला. यामुळे वर्षानुवर्षे बेलगाम कारभाराची सिस्टीमच पालिकेत निर्माण झाली आहे. अनेक कर्मचारी दिवसभर कुठे असतात याचा नागरिकांना पत्ता नसतो. बेशिस्त वर्तणूक, हलगर्जीपणा आदींसह विविध कारणांमुळे पालिकेलाही महसुलासह अन्य नुकसानीला सामोरे जावे लागते. नागरिकांचीही पालिकेच्या कामकाजाबाबत ओरड कायमचीच बनली आहे.

शहरातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. रस्ते, स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा आदी प्रश्नांवर मात करण्याचे मोठे आव्हान आयुक्तांसमोर आहे. महापालिकेचा कारभार सुधारण्यासाठी प्रशासनाला शिस्त लावणेही तितकेच गरजेचे आहे. पालिकेची सेवा सक्षम, गतिमान होण्यासाठी दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याच्या मोहिमेत सातत्य ठेवण्याबरोबरच पालिकेच्या कामकाजाला गती येण्यासाठी विशेष प्रयत्न आयुक्तांना करावे लागणार आहेत.

पालिका आवारात आणखी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

इचलकरंजी महापालिकेतील कामचुकारांना आळा बसावा यासाठी पालिका आवारात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे नव्याने बसवण्यात यावेत व त्याचे मॉनिटरिंग आयुक्तांच्या कार्यालयातून व्हावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे महापालिकेच्या धर्तीवर पालिकेत तसेच प्रत्यक्षात प्रभागात काम करणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जीपीएससारख्या प्रणालीचा वापर असलेला रिस्ट बँड कर्मचार्‍यांना दिल्यास पालिकेच्या कामाला आणखी शिस्त लागणार आहे.

Back to top button