कोल्हापूर : धरणाची गळती काढण्यासाठी यंदा काळम्मावाडीत 75 टक्केच साठा | पुढारी

कोल्हापूर : धरणाची गळती काढण्यासाठी यंदा काळम्मावाडीत 75 टक्केच साठा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी (दूधगंगा) धरणात यंदा 75 टक्केच म्हणजे 19 टीएमसी पर्यंतच पाणीसाठा ठेवण्यात येणार आहे. धरणाची गळती काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला आहे. ‘इंजेक्शन ग्राऊटिंग’ पद्धतीने हे काम केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी दिली.

काळम्मावाडी धरणाला काही ठिकाणी गळती आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. ते पूर्ण करण्यासाठी पाणीसाठा मर्यादित असणे आवश्यक आहे. या धरणाची क्षमता 25.39 टीएमसी आहे.

या धरणातून सिंचन, औद्योगिक तसेच पिण्यासाठी लागणारे पाणी आणि कर्नाटकला द्यावे लागणारे अशा एकूण 19 टीएमसी पाण्याची गरज असते. तेवढेच पाणी साठवले जाणार आहे. क्षमतेपेक्षा 6.39 टीएमसी पाणीसाठा यावर्षी कमी राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी सांगितले.

गळती काढण्याचे हे काम ‘इंजेक्शन ग्राऊटिंग’ पद्धतीने केले जाणार आहे. धरणाच्या वरील भागापासून ते अगदी तळापर्यंतच्या भागात हे काम केले जाणार आहे. धरणाच्या भिंतीत असलेल्या गॅलरीतून टनेलमधून (बोगदा) जाऊन गळती काढली जाणार आहे. या पद्धतीत इंजेक्शनद्वारे सिमेंट भिंतीत सोडले जाणार आहे. प्रचंड दाबाने (प्रेशर) हे सिमेंट भिंतीत सोडले जाते. ते वेगाने जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथपर्यंत जाते. या पद्धतीने धरणाच्या भिंतीत असलेल्या पोकळ्या सिमेंटने भरून काढण्यात येणार आहे. दूधगंगा विभागाकडून हे काम केले जाणार आहे.

Back to top button