कोल्हापूर : समन्वयाने संभाव्य पूरस्थिती हाताळा | पुढारी

कोल्हापूर : समन्वयाने संभाव्य पूरस्थिती हाताळा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

संभाव्य पूरस्थिती नियंत्रणासाठी सतर्क राहा, समन्वयाने परिस्थिती हाताळा, अशा सूचना जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण दराडे यांनी बुधवारी जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली.जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीचे पाणी इशारा पातळीकडे वाढत जात आहे. हवामान विभागानेही जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला होता. यानंतर दुसर्‍याच दिवशी बुधवारी जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण दराडे कोल्हापुरात दाखल झाले. सायंकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या पूर परिस्थिती नियोजनाचा संबंधित सर्व यंत्रणा, विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आढावा घेतला.

संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचे सांगत दराडे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीची शक्यता गृहीत धरून पूरस्थिती पूर्व, पूरस्थिती काळात व पूरस्थिती पश्‍चात आवश्यक असणार्‍या कामांचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करा. सर्व विभागांनी मिळून समन्वयाने परिस्थिती हाताळा. आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही त्रुटी राहता कामा नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करा, असेही त्यांनी सांगितले.

कोणतीही घटना घडल्यास तत्काळ त्या ठिकाणी पोहोचा. याकरिता विभागप्रमुखांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश देत दराडे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकार्‍यांनी ‘टीम लीडर’ म्हणून तर अन्य सर्व विभागांनी त्यांच्या मार्गदर्शनाने ‘टीम वर्क’ म्हणून काम करावे.पुराचे पाणी येणार्‍या मार्गांवर व पुलांवर पोलिस कर्मचारी तैनात ठेवा. महामार्गांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात घडू नये, यासाठी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी.

पूरबाधित नागरिकांचे व जनावरांचे वेळेत स्थलांतर करा. स्थलांतरित नागरिकांच्या शिबिरात आवश्यक त्या सर्व सेवा, सुविधा उपलब्ध करुन द्या, असे सांगत नेमून दिलेल्या अधिकार्‍यांनी त्या-त्या ठिकाणांची पाहणी केल्याचा अहवाल मागवून घ्यावा. पूरस्थितीत अशुद्ध पाण्यामुळे रोगराई पसरू नये, यासाठी पूरबाधित नागरिकांना व स्थलांतरित शिबिरामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करा. नागरिकांनी शुद्ध अथवा उकळून पाणी पिण्याबाबत जनजागृती करा. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरू नये, यासाठी जंतुनाशक फवारणी व अन्य आवश्यक ती खबरदारी घ्या. पूरस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, असेही दराडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांच्यासह विविध विभाग प्रमुखांनी पूरस्थिती नियंत्रणाबाबत केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, स्मिता माने आदींसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विभागांनी केलेल्या पूरनियंत्रण कामांची पाहणी करा

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर रेडे डोहाजवळ पाणी जाण्यासाठी नळे बसविण्यात आले आहेत. मात्र, त्याची सफाई होत नसल्याने पाणी रस्त्यावर येऊन मार्ग बंद होतो. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे केली असल्याचे सांगितले. त्यावर तहसीलदार आणि पोलिस अधिकार्‍यांच्या पथकाकडून अशा कामांची पाहणी करा, असे आदेश दराडे यांनी जिल्हाधिकारी रेखावार यांना दिले. मुसळधार पावसाने झाडे उन्मळून पडण्याचा धोका असतो, त्या अनुषंगाने प्रमुख मार्गांवरील झाडांचा सर्व्हे करून आवश्यकतेनुसार छाटणी करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

रुग्णांना स्थलांतरित करण्याचे नियोजन

पूरस्थिती गंभीर होण्यापूर्वीच पूरबाधित परिसरातील रुग्णालयातील रुग्णांना स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महापालिकेच्या वतीने अशा रुग्णालय प्रशासनाची यापूर्वी बैठक घेतली असून, त्यांना तसे लेखीही कळवण्यात आल्याचे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

महावितरणचे तीन हजार कर्मचारी सज्ज

संभाव्य पूरस्थितीत महावितरणने आवश्यक ती सज्जता केल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. डी. पी. पाण्यात बुडाला, तरी त्याचे नूकसान होणार नाही, याकरिता जिल्ह्यात प्रथमच यावर्षी नावीन्यपूर्ण उपाय योजना राबविली जात आहे. सबस्टेशनमधील पॉवर ट्रान्स्फॉर्मर, तसेच डिस्ट्रीब्यूटर ट्रॉन्स्फॉर्मर जादा आणि विविध ठिकाणी उपलब्ध करून ठेवले आहेत. यासह महावितरणने 3 हजार कर्मचारी सज्ज ठेवले असल्याचेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.

कोल्हापूरचा पाणीपुरवठा सुरळीत राहील

महापालिकेने पाणी उपसा पंपाचे सबमर्सिबल पंपात रूपांतर केले आहे. यामुळे पूरस्थिती गंभीर झाली, तरी 60 टक्के लोकांना पाणीपुरवठा सुरळीत होईल. येत्या वर्षभरात आणखी एक असा पंप केला जाणार आहे. यामुळे भविष्यात उर्वरित 40 टक्क्यांसह सर्व कोल्हापूर शहरात पूरस्थितीतही पाणीपुरवठा सुरळीत राहील, असा विश्वास दराडे यांनी व्यक्‍त केला.

प्रशासनावर ताण आणू देऊ नका

पूरस्थिती निर्माण झाली की, पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. धोका पत्करून अनेकजण पुराच्या पाण्यातून ये-जा करणे, वाहने घालणे असे प्रकार करतात. पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर शक्यतो घराबाहेर पडू नका. पूर पाहण्यासाठी गर्दी करणे, धोकादायक पद्धतीने पुराच्या पाण्यातून ये-जा करणे असे प्रकार करू नका, प्रशासनावर ताण आणू देऊ नका, असे आवाहनही दराडे यांनी केेले.

Back to top button