किणी, तासवडे टोल : मुदत संपूनही राष्ट्रीय महामार्गावर ‘टोल’धाड? | पुढारी

किणी, तासवडे टोल : मुदत संपूनही राष्ट्रीय महामार्गावर ‘टोल’धाड?

किणी ; राजकुमार बा. चौगुले : 17 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी व तासवडे टोल नाक्यांची मुदत संपली आहे. सहा पदरीकरणाची अद्याप सुरुवातही नाही, अशा स्थितीत टोल वसुली बंद करण्याऐवजी राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडून टोल वसुली सुरू करण्यात येत आहे. मुदत संपल्यानंतरही ‘टोल’धाड का? असा सवाल वाहनधारकांतून उपस्थित होत आहे. तत्काळ टोल वसुली स्थगित करण्याची मागणी होत आहे.

काय आहे योजना?

‘सुवर्ण चतुष्कोन’ हा तत्कालीन केंद्र सरकारने हाती घेतलेला ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (पीपीपी) तत्त्वावरील भारतातील सर्वात मोठा व जगातील 5 व्या क्रमांकाचा रस्ते बांधणी प्रकल्प होता. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘सुवर्ण चतुष्कोन’ प्रकल्पाची घोषणा केली. सुवर्ण चतुष्कोन योजनेंतर्गत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्‍नई ही भारताची चार प्रमुख महानगरे चौपदरी वा सहापदरी द्रुतगती मार्गांनी जोडली गेली आहेत. 1999 साली सुरू झालेले हे काम 2005 साली पूर्ण झाले.

सदोष कामांमुळे सातत्याने तक्रारी

राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील या कामासाठी सातारा (शेंद्रे) ते कागल या 133 किलोमीटरच्या कामाचा ठेका महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला. त्यांनी उपठेकेदार नेमून विविध कंपन्यांना कामे दिली. मात्र, सदोष व अर्धवट कामांमुळे हा महामार्ग सातत्याने चर्चेत राहिला. कामे अर्धवट असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातील किणी व सातारा जिल्ह्यातील तासवडे येथे टोल नाके उभारून राज्य रस्ते विकास महामंडळाने टोल वसुली सुरू केली होती.

लोकांचा प्रचंड विरोध

2005 च्या प्रारंभीस वाहनधारकांनी अपुर्‍या कामांमुळे टोल वसुलीला तीव्र विरोध केला. त्यामुळे संबंधित यंत्रणेने काहीसे नमते घेत काही दिवस टोलची अर्धी रक्‍कम घेण्यात येत होती. काही महिन्यांनंतर मात्र पूर्ण टोल वसुली सुरू झाली. त्यात वाहनधारकांचा विरोध असतानाही वेळोवेळी वाढच होत गेली.

2 मे रोजी मुदत संपली; पण…

2 मे 2022 रोजी या टोलची मुदत संपली असली, तरी नोटाबंदी, कोरोना व महापुराच्या कालावधीत काही दिवस टोल कलेक्शन बंद ठेवल्याचे कारण पुढे करण्यात आले. या बंद काळातील टोल कलेक्शन भरून काढण्यासाठी टोल वसुलीला पुन्हा 53 दिवस मुदतवाढ देत वाहनधारकांच्या खिशावर डल्‍ला मारण्यात आला. आता 53 दिवसांची वाढीव मुदतही संपली आहे, त्यामुळे नियमाप्रमाणे टोल वसुली स्थगित करण्याची आवश्यकता होती; पण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडे कोल्हापूर जिल्ह्यातील किणी व सातारा जिल्ह्यातील तासवडे हे दोन्ही टोल नाके 24 जूनच्या मध्यरात्रीपासून हस्तांतरित केले आणि पुन्हा टोल वसुली पूर्ववत सुरू ठेवण्यात आली आहे.

…तर टोल वसुली कशासाठी?

या टोलधाडीसाठी भविष्यातील सहा पदरीकरणाचे कारण सांगण्यात येत आहे; पण सहापदरीकरण झालेच नाही तर टोल कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. तासवडेपासून पुढे पुण्याच्या बाजूस सहापदरीकरण पूर्ण झाले असून, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत निविदा प्रक्रिया सुरू असली, तरी अजून सहापदरीकरणास मुहूर्त झाला नाही; मग कशासाठी टोल वसुली करण्यात येत आहे, असा सवाल वाहनधारक करत आहेत. सरकारनेच वाहनधारकांची होणारी लूट थांबविण्याची गरज आहे.

Back to top button