कोल्हापूर : मंडळांनी साथरोग नियंत्रणाचा विडा उचलला, तर नवा पॅटर्न | पुढारी

कोल्हापूर : मंडळांनी साथरोग नियंत्रणाचा विडा उचलला, तर नवा पॅटर्न

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : कोल्हापूर हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सामाजिक चळवळींचे उगमस्थान म्हणून ओळखले जाते. कोल्हापूरच्या गणेशोत्सवालाही दीर्घकाळ पुरोगामी विचारांची बैठक आहे. यामुळेच कोल्हापूरचा गणेशोत्सव राज्यात आपले वेगळे स्थान टिकवून आहे. कोल्हापुरातील साथरोगाच्या नियंत्रणासाठी गणेशोत्सवाचे व्यासपीठ वापरता येणे शक्य आहे.

बुद्धीचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणपतीच्या उत्सवात कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साथरोग नियंत्रणाचा विडा उचलला, तर देशात एक नवा पॅटर्न निर्माण करण्याची संधी आहे. यामुळे कोल्हापूरवर आलेले साथरोगाचे विघ्नही दूर करता येणे शक्य आहे.

100 वर्षांच्या कोल्हापूरच्या गणेशोत्सवाच्या माहितीची पाने चाळली की, या उत्सवातील राज्यातील वेगळेपण लक्षात येते. कलानगरी, चित्रपटांचे माहेरघर, लोकचळवळींचे उगमस्थान असलेल्या कोल्हापुरात गणेशोत्सवाला ही सर्व परिमाणे प्रारंभापासूनच चिकटली. यामुळे लोकमान्यांच्या कल्पनेतील गणेशोत्सव कोल्हापुरात साकारला गेला. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शिवाजी पेठेत सामाजिक प्रबोधनपर व्याख्यानमाला सुरू झाल्या.

समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा यावर घाव घालणारे चित्ररथ, कलात्मक देखावे, पथनाट्ये आणि सजीव देखावे यांनी एक अनोखी परंपरा निर्माण केली. यामुळेच हा उत्सव पाहण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यांतील नागरिकांचे लोंढे येतात. चालूवर्षी या परंपरेचा धागा आणखी पुढे नेण्यासाठी साथरोग नियंत्रणाच्या जनजागृतीचे आव्हान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वीकारले, तर डेंग्यूच्या डासांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

गणेशोत्सवाच्या काळामध्ये मंडळांच्या कार्यकर्त्यांनी 10 दिवसांच्या कालावधीसाठी एक अजेंडा निर्माण केला पाहिजे. यामध्ये आपल्या परिसरात डासांची पैदास होणारी ठिकाणे शोधणे, जेथे डास निर्माण झाले आहेत, त्या परिसरात निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविणे आणि भविष्यात डास पैदास होणार नाहीत, या खबरदारीसाठी नागरिकांना गांभीर्य पटवून देणे आदी बाबी प्राधान्यक्रमाने कराव्या लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोल्हापूर शहरात विनावापर असलेली तळघरे (बेसमेंट) आणि अर्धवट स्थितीतील बांधकामे ही डेंग्यूच्या डासांची उगमस्थाने म्हणून पुढे आली आहेत.

ही ठिकाणे शोधण्याची जबाबदारी कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना घेता येऊ शकते. अशा ठिकाणांमधील साचलेले पाणी नष्ट केले, तर बर्‍याच अंशी कोल्हापुरातील डेंग्यूचा मुक्‍काम हलविता येऊ शकतो. कोल्हापूर शहरात छोटी-मोठी अशी सुमारे 1 हजारावर गणेशोत्सव मंडळे आहेत, तर ग्रामीण भागात ही संख्या 5 हजारांवर आहे.

कोल्हापूरनेच ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम सर्वप्रथम राबविला आणि महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला. मूर्तिदान चळवळ राबवून पर्यावरणाच्या क्षेत्रातही गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या कामानेच कोल्हापूरचे नाव जगाच्या कानाकोपर्‍यात गेेले. या गणेशोत्सव मंडळांनी साथरोग नियंत्रणासाठी विघ्नहर्त्याच्या उत्सवाचे व्यासपीठ वापरले, तर कोल्हापूरकरांच्या आरोग्यावर आलेले संकट दूर होऊ शकते.

Back to top button