इचलकरंजी : शेतीसाठी पाणी उपशावर येणार बंदी? | पुढारी

इचलकरंजी : शेतीसाठी पाणी उपशावर येणार बंदी?

इचलकरंजी ; विठ्ठल बिरंजे : हंगामी पावसाने दडी मारल्याने भात, सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आले असतानाच आता नदीपात्रातून शेतीसाठी उपसा होणार्‍या पाण्यावरही बंदी येण्याची शक्यता गडद होऊ लागली आहे. त्यामुळे हातातोंडाला आलेले नगदी ऊस पीकही वाया जाण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

राधानगरी धरणात केवळ 2.29 टीएमसी पाणी शिल्‍लक आहे, तर काळम्मावाडी धरणातही केवळ 6 टीएमसी पाणीसाठा शिल्‍लक आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास पंचगंगा नदीकाठावरील करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील गावांना फक्‍त पिण्यासाठीच पाणी मिळू शकते. वारणा आणि कोयना धरणांतील पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

वारणा (चांदोली) धरणात फक्‍त 10.60 टीएमसी पाणी शिल्‍लक आहे, तर कोयना जलाशयात 15 टीएमसी पाणी शिल्‍लक आहे. त्यामुळे कोयनेतून 2100, तर चांदोलीतून 586 क्युसेक पाणी सोडले जात आहे. दरम्यानच्या काळात पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांवरील बंधार्‍यांतील बरगे 31 मेपूर्वीच काढल्याने वारणा, पंचगंगेची पाणीपातळी कमी झाली असून, कृष्णेचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे इचलकरंजीसह शिरोळ तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा पाणी उपसा बंद झालेला आहे. येत्या दोन दिवसांत पंचगंगा, वारणा नदीपात्रातही असेच चित्र दिसणार आहे.

…तर महापुराचा धोका कमी

यंदा धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. पावसाने जोर धरला तरी धरणे फुल्‍ल होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे विसर्ग होणार नसल्याने महापुरावर आपोआपच नियंत्रण राखता येणे शक्य आहे. गेल्या दोन वर्षांत उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणांतील पाणीसाठा स्थिर होता. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच धरणे भरून विसर्ग सुरू झाल्यामुळे पूरस्थिती उद्भवली होती; परंतु यंदा बरोबर उलट चित्र आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागांना दिलासा मिळणार आहे.

Back to top button