बिहारमध्ये ‘एनडीए’पुढे विरोधक भुईसपाट

बिहारमध्ये ‘एनडीए’पुढे विरोधक भुईसपाट

[author title="धीरज कुमार, विश्लेषक" image="http://"][/author]

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत 'एनडीए'च्या झंझावातापुढे विरोधी इंडिया आघाडीची भंबेरी उडाली. 'एनडीए'ने चाळीसपैकी तब्बल तीस जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि विरोधकांना केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले. त्यातही राष्ट्रीय जनता दलाच्या पदरी पडलेले अपयश धक्कादायक ठरले.

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत 'एनडीए' पुढे इंडिया आघाडीची भंबेरी उडाली. 'एनडीए'ने चाळीसपैकी सुमारे तीस जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि विरोधकांना केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले. त्यातही राष्ट्रीय जनता दलाचेे अपयश धक्कादायक ठरले. 'एनडीए'मधील भाजप आणि जदयू या दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रत्येकी 12 जागा, तर लोजप (रामविलास) गटाने पाच आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाने एक जागा जिंकली. दुसरीकडे, विरोधी इंडिया आघाडीतील राष्ट्रीय जनता दलाने (राजद) चार, काँग्रेसने तीन आणि सीपीआय (एमएल) या पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला. लक्षवेधी ठरलेल्या पूर्णिया मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांनी जदयूचे उमेदवार संतोष कुशवाह यांच्यावर तेवीस हजारांहून अधिक मतांनी मात केली. या निवडणुकीत भाजपने सतरा, जदयूने सोळा, लोजपने पाच आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाने एक जागा लढविली. विरोधी इंडिया आघाडीतील राजदने तेवीस, काँग्रेसने नऊ, सीपीआय (एमएल) आणि विकासशील इन्सान पक्षाने प्रत्येकी तीन, तर माकप व भाकप यांनी प्रत्येकी एक जागा लढविली.

या निवडणुकीत राजदने सर्वाधिक 22.14 टक्के मिळवली; मात्र या मतांचे मतपेटीत रूपांतर करण्यात त्या पक्षाला यश आले नाही. भाजपला त्यापेक्षा कमी म्हणजे 20.52 टक्के मते मिळाली. जदयूला 18.52 टक्के, काँग्रेसला 9.2 टक्के, लोजपला 6.47 टक्के मते मिळाली. 2.07 टक्के मतदारांनी नोटा म्हणजेच कोणत्याही उमेदवाराला मत न देणे पसंत केले. ही आकडेवारी अचंबित करणारी ठरली. 2019 मधील लोकसभेला भाजपने लढविलेल्या सर्व सतरा जागांवर विजय मिळवला होता. जदयूने सतरा जागा लढवून सोळा ठिकाणी जय खेचून आणला होता. लोजपने सहा जागांवर उमेदवार उभे केले आणि सगळ्या जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी विरोधी आघाडीची वाताहत झाली होती. मुस्लिमांचे प्राबल्य असलेल्या किशनगंज या एकमेव मतदारसंघात काँगे्रसला विजय मिळाला होता. तेव्हा राजदला तर खातेही उघडता आले नव्हते.

यावेळी लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांनी हाजिपूर मतदारसंघातून राजदचे उमेदवार शिवचंद्र राम यांना 6,15,718 मतांच्या फरकाने धूळ चारली. ही जागा त्यांचे दिवंगत वडील रामविलास पासवान नेहमीच विक्रमी मताधिक्याने जिंकत असत. काराकट मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांचा पराभव 'एनडीए'ला जिव्हारी लागला. ते थेट तिसर्‍या क्रमांकावर ढकलले गेले. तेथे सीपीआय (एमएल) या पक्षाचे उमेदवार राजाराम सिंह यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार तथा भोजपुरी गायक-अभिनेते पवन सिंह यांच्यावर 3,80,581 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. पवन यांच्या उमेदवारीमुळे 'एनडीए'ला मोठा फटका बसला.

लालूंसाठी थोडी खुशी, थोडा गम

इंडिया आघाडीचा विचार केला तर राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसाभारती यांनी पाटलीपुत्र मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी भाजपचे खासदार रामकृपाल यादव यांना 6,13,283 मतांच्या फरकाने धूळ चारली; मात्र लालूप्रसाद यांची आणखी एक कन्या रोहिणी आचार्य यांना सारन मतदारसंघातून भाजपचे खासदार राजीवप्रताप रुडी यांच्याकडून 4,71,752 मतांच्या फरकाने हार पत्करावी लागली.

आरा मतदारसंघातून सीपीआय (एमएल) या पक्षाने एनडीए आघाडीसाठी धक्कादायक ठरणारा निकाल नोंदवला. या पक्षाचे उमेदवार सुदामा प्रसाद यांनी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांना पाच लाखांहून अधिक मतांच्या फरकाने धूळ चारली. राजदचे अभय कुशवाह यांनी औरंगाबाद मतदारसंघातून भाजपचे खासदार सुशीलकुमार सिंह यांना चार लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पाणी पाजले. यावेळी राजदने कुशवाह समाजातील सात नेत्यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. कारण, या सातपैकी केवळ दोघांनाच विजय मिळविणे शक्य झाले.

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या जोरावर 'एनडीए'ने अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यामुळे ते आणि तेलुगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हे 'एनडीए'चे प्रमुख आधारस्तंभ बनले आहेत. आंध्र प्रदेशात तेलुगू देसम, जनसेना आणि भाजपने विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवत मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. भाजप अन्य पक्षांच्या मदतीने केंद्रात आपली पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू आपल्याकडे येतील, असा अंदाज इंडिया आघाडीने व्यक्त केला होता; पण तो साफ चुकीचा ठरला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news