कोल्हापूर : उमेदवार तगडाच पाहिजे! ; राजकीय पक्षांची लागणार कसोटी | पुढारी

कोल्हापूर : उमेदवार तगडाच पाहिजे! ; राजकीय पक्षांची लागणार कसोटी

कोल्हापूर : सतीश सरीकर
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप-ताराराणी आघाडी आदींनी स्वबळाचा नारा दिला आहे. या पक्षांना 92 जागांसाठी प्रत्येकी 4 याप्रमाणे तब्बल 368 उमेदवार लागतील. आम आदमी पार्टीसह इतरही पक्ष रिंगणात आहेत. परिणामी, प्रभागात लोकप्रिय असलेले आणि आर्थिकद़ृष्ट्या सक्षम अशा 400 उमेदवारांची आवश्यकता असेल. प्रत्येक प्रभागांत उमेदवार मिळविण्यासाठी नेत्यांचीच कसोटी लागणार आहे.

कोल्हापूर महापालिकेवर 2010 पासून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. 2015-2020 या सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले. परंतु, 2020 नंतर निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसचे नेते व पालकंमत्री सतेज पाटील यांनीही स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही रणांगणात स्वतंत्र उतरू, असे स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना महापालिकेवर एकहाती सत्ता पाहिजे आहे. भाजप-ताराराणी आघाडी मात्र एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे. माजी खा. धनंजय महाडिक यांच्या खांद्यावर भाजप-ताराराणी आघाडीची धुरा असेल.

सद्यस्थितीत जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीसुद्धा काँग्रेससोबत विविध संस्थांच्या सत्तेत भागीदार आहे. गोकुळसह केडीसीवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महापालिकेवर एकहाती सत्तेचा झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी आर्थिकद़ृष्ट्या प्रबळ आणि निवडून येऊ शकतील अशा उमेदवारांना आतापासूनच गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे दोन खासदार आहेत. परंतु, महापालिकेच्या राजकारणापासून ते लांब आहेत. भाजप-ताराराणी आघाडीने 2015 च्या निवडणुकीत चांगली झुंज दिली होती. त्यामुळे यंदा भाजप-ताराराणी आघाडीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपचा उमेदवार चालणार नाही, त्या प्रभागात ताराराणी आघाडीचा उमेदवार देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

गेल्या सभागृहातील बहुतांश माजी नगरसेवक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्याबरोबरच विविध आरक्षणामुळे निवडणुकीपासून लांब राहावे लागलेल्या इच्छुकांनीही मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. काही माजी नगरसेवक व इच्छुकांनी आतापासूनच खर्चाची धास्ती घेतली आहे. पूर्वी एक प्रभाग रचना असताना गल्लोगल्ली इच्छुक होते. परंतु, आता त्रिसदस्यीय प्रभाग रचना असल्याने एकूण खर्चाची गणिते आणि तरुण मंडळे, तालीम संस्था यांना पाच वर्षे सांभाळून ठेवणे याचा लेखाजोखा मांडला जात असल्याने इच्छुक आर्थिक विवंचनेत आहेत. निवडणूक लढविण्याविषयी त्यांची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे. परिणामी, प्रत्येक प्रभागात सक्षम आणि प्रबळ उमेदवारासाठी नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

…अन्यथा महाविकास आघाडीला बंडखोरीचा धोका

निवडणुकीसाठी दोन-तीन वर्षांपासून इच्छुक कामाला लागले आहेत. अनेकांनी लाखाच्या पटीने खर्चही केला आहे. यात सर्वच पक्षांच्या इच्छुकांचा समावेश आहे. राज्य पातळीवर महाविकास आघाडीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला, तर कोल्हापूर महापालिकाही त्याला अपवाद असणार नाही. परंतु, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक असून उमेदवारी मात्र एकेकालाच मिळणार आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांना बंडखोरीचा धोका निर्माण होणार आहे. उमेदवारी न मिळालेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतील सक्षम उमेदवार भाजप-ताराराणी आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेच्या सत्तेची समीकरणेही बदलू शकतात.

Back to top button