धक्कादायक! रूकडीत २८ वर्षे धनगर कुटुंबांवर बहिष्कार, ‘ती’ने घरातच खड्डा खणून पतीचे केले अंत्यसंस्कार | पुढारी

धक्कादायक! रूकडीत २८ वर्षे धनगर कुटुंबांवर बहिष्कार, 'ती'ने घरातच खड्डा खणून पतीचे केले अंत्यसंस्कार

इचलकरंजी; संदीप बिडकर : रूकडी (ता. हातकणंगले) येथील धनगर समाजातील सुमारे आठ कुटुंबांतील 50 जणांवर गेली अनेक वर्षे जात पंचायतीने बहिष्कार घातला आहे. यापैकी काही कुटुंबे तर गेली 28 वर्षे हा त्रास सहन करीत आहेत. त्यांच्याशी कोणताही व्यवहार केला जात नाही. बहिष्कार घातलेल्या कुटुंबाबरोबर समाजातील दुसरी कोणी व्यक्ती बोलली तरी त्याला 3 हजार रुपये दंड केला जातो. दंड न दिल्यास त्याच्यावरही बहिष्कार घातला जातो. जात पंचायतीचा हा कारभार गेली कित्येक वर्षे सुरू आहे. याबाबत आवाज उठविणार्‍या एका लष्करातील जवानाच्या घरावरही बहिष्कार घालण्याचा प्रकार घडला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या संस्थानात व त्यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या रूकडी गावातच हा प्रकार घडत असल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

रूकडी गावामध्ये धनगर समाजाची सुमारे 600 लोकसंख्या आहे. यातील काही कुटुंबे मुख्य गावातच राहतात. तर रेल्वे फाटकाच्या बाजूला काही कुटुंबे नवीन वसाहत करून राहिली आहेत. दिवसभर मेंढ्यांच्या मागे राना-वनात फिरून तसेच दुसर्‍याची जमीन कसून त्यावर उदरनिर्वाह करणारा हा गरीब समाज आहे. गावामध्ये बिरोबाचे मोठे मंदिरही आहे. या मंदिरामध्ये पूजा-अर्चा करण्याचा मान जवळपास सर्वच कुटुंबांना फेरा-फेराने मिळतो; परंतु समाजातील नेते म्हणवून घेणार्‍यांनी याचा मक्ताच घेतल्याने हिशेब मागायला कोणी गेले तर त्याला वाळीत टाकण्याची धमकी देऊन, आतापर्यंत अनेकांना वाळीत टाकले आहे, असा आरोप केला जातो. वाळीत टाकलेल्या कुटुंबातील व्यक्तीशी बोलले तरी बोलणार्‍याला 3 हजार रुपये दंड केला जातो. व बोलल्याची माहिती देणार्‍याला 500 रुपये बक्षीस नेत्यांकडून दिले जाते.

हा बहिष्कार आता लहान मुलांपर्यंत येऊन पोहोचला आहे. बहिष्कार टाकलेल्या कुटुंबांतील मुलांना खेळायला घेतले जात नाही. तसेच त्यांच्या दुकानातील साहित्यही खरेदी केले जात नाही. संबंधितांच्या घरी लग्न किंवा शुभकार्य असल्यास समाजातील इतर कोणीही जात नाही. गेल्यास त्याला दंड केला जातो. दंड न भरल्यास संबंधित कुटुंबालाच वाळीत टाकले जाते. बहिष्कृत कुटुंबांतील कोणाचा मृत्यू झाला तरी माणुसकी म्हणूनही कोणीही तिकडे फिरकत नाही. सध्या बहिष्कार घातलेल्या घरातील मुले मोठी झाली आहेत. शिकलेल्यांना सामाजिक जाणीव आहे. त्यामुळे या विरोधात आवाज उठविण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु अद्यापपर्यंतही त्यांना यश आलेले नाही. सैन्यदलात सेवा बजावणारे देवेंद्र शिणगारे यांच्या कुटुंबावरही बहिष्कार घालण्यात आला आहे. त्यांनी याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच हातकणंगले पोलिसांत याबाबत तक्रार केली; परंतु या जवानाच्या पदरी निराशाच आल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.

गावातील प्रमुख मंडळींनीही धनगर समाजाची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; परंतु धनगर समाजातील नेते बैठकीवेळी सर्व काही योग्य आहे. आम्ही बहिष्कार घालणार नाही. सर्वांना सामावून घेऊ, असे आश्वासन देतात. त्यानंतर बैठकीतून उठल्यावर पुन्हा आपल्याला हवे तेच करतात. त्यामुळे धनगर समाजातील आठ कुटुंबांतील 50 जण सध्या दहशतीच्या वातावरणात बहिष्कृत आयुष्य जगत आहेत. पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणून मिरविणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे 75 वर्षे झाली तरी जात पंचायत, बहिष्कार घालणे असे प्रकार घडत असल्याने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

पतीचे अंत्यसंस्कार केले घरातच

एका बहिष्कार टाकलेल्या कुटुंबामध्ये वृद्ध पती-पत्नी व त्यांची मनोरुग्ण मुलगी राहात होती. दोन वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले; परंतु निधनानंतर विधिवत अंत्यसंस्कार करण्यासाठी समाजातील कोणीही पुढे आले नाही. शेवटी वाट बघून संबंधित महिलेने खड्डा खणून घरातच पतीचे अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समाजातील एका वयोवृद्ध महिलेने सांगितले.

मी देवच नाही बघितला…

नाव न सांगण्याच्या अटीवर 21 वर्षीय तरुणाने व्यथा मांडताना सांगितले की माझ्या जन्माच्या अगोदरपासून माझ्या कुटुंबावर बहिष्कार आहे. मी आतापर्यंत गावातील आमच्या समाजाचे मंदिर किंवा मंदिरातील देवही बघितलेला नाही. जर आमच्यापैकी कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात किंवा मंदिरातील वस्तू चोरल्याचा आरोप केला जातो. भविष्यात जीवास धोका होईल, या भीतीने त्याने आपले नाव सांगण्यास नकार दिला.

Back to top button