कोल्हापूर : ‘शिवरायांच्या प्रेरणेने देश महासत्ता होईल’ | पुढारी

कोल्हापूर : 'शिवरायांच्या प्रेरणेने देश महासत्ता होईल'

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा नीतिमत्तेच्या बळावर भारताची विश्‍वगुरू म्हणून वाटचाल सुरू आहे. भारत महासत्ता म्हणून विश्‍वगुरू म्हणून उदयाला येईलच. पण, त्याला अन्य महासत्तांप्रमाणे आर्थिक आणि लष्करी शोषणाचे अंग नसेल, असे सांगत केंद्रीय माहिती आयुक्‍त उदय माहुरकर यांनी या विश्‍वगुरू बनण्यामागील प्रेरणास्रोत हे छत्रपती शिवाजी महाराज असतील, असे स्पष्ट केले.

  • 2027 मध्ये 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा टप्पा
  •  प्रशासनात बदल
  •  सरकारी खर्चात बचत
  •  सॉफ्टवेअरमध्ये दबदबा

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुढारी’कार कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत ‘भारत एक जागतिक महासत्ता’ या विषयावर उदय माहुरकर बोलत होते. व्यासपीठावर दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.

कोणताही देश जगाची महासत्ता होताना अनेक निकषांचा विचार होतो. त्यामध्ये अर्थनीती, जागतिक पातळीवर सामना करावा लागणारा दहशतवाद आणि हवामानातील बदल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सर्वांसाठी वापर अशा काही प्रमुख बाबींचा यामध्ये समावेश होतो. त्याशिवाय काही अशा गोष्टी असतात की, त्याचा फार मोठा प्रभाव विशेषतः नैतिक प्रभाव पडत असतो. त्यामध्ये भारतीय योगाचे फार मोठे महत्त्व असल्याचे उदय माहुरकर म्हणाले.

2027 मध्ये पाच ट्रिलियन टप्पा गाठणार

भारतात 2012 ते 2019 या काळात लाखो लोक दारिद्य्र रेषेच्या वर आल्याचा गौरवपूर्ण उल्‍लेख करून माहुरकर म्हणाले की, भारताने महासत्ता होण्याच्या द‍ृष्टीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे मला वाटते. गेल्या सात-आठ वर्षांत या दिशेने आणखी महत्त्वपूर्ण वाटचाल सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना आला नसता तर भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स एवढी असती. आज ती तीन ट्रिलियन डॉलर्स एवढी आहे. पाच ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा आपण 2027 पर्यंत गाठणार आहोत. चीनने महासत्ता होण्यासाठी दारिद्य्र रेषेखालील लोकांना त्या रेषेच्या वर आणण्याचे धोरण निश्‍चित करून 80 कोटी लोकांना दारिद्य्र रेषेच्या वर आणले आणि महासत्तेच्या द‍ृष्टीने एक भक्‍कम पाऊल टाकले. आज भारत याच दिशेने वाटचाल करीत आहे.

भारताच्या डिजिटायझेशनने जगाला थक्‍क करून सोडल्याचे सांगून माहुरकर म्हणाले की, युरोपातील दोन मोठे उद्योग स्कोडाचे भारतात पार्टनर आहेत. यावरून युरोपियन देश या डिजिटायझेशनने किती थक्‍क झाले आहेत हे दिसून येते. 130 कोटी लोकसंख्येच्या देशात हे घडून येते आहे ही फार मोठी गोष्ट आहे. हे होण्यामागे अनेक कारणे आहेत. 1970 पर्यंत देशात अनेक गोष्टी योग्य प्रकारे घडत होत्या. त्यानंतर मात्र उत्तरदायित्व आणि पारदर्शकता यांचा अभाव पहिल्यांदा राजकारणात दिसला आणि तो पाझरत प्रशासनातही आला. त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागले.

ते म्हणाले, 1970 नंतर नेत्यांना माझ्याशी निष्ठावंत कोण आहे याचे महत्त्व वाटू लागले. त्यातून राजकारण आणि प्रशासन बिघडत गेले. हा माझा आहे. तो माझ्याशी निष्ठावंत आहे. मग त्याला काहीही करू द्या, हा मतप्रवाह जोरकसपणे प्रवाहित झाला आणि त्यातूनच अनेक चुकीच्या गोष्टी घडत गेल्या. 1970 ते 80 या काळात याचा वेग काहीसा मंद होता. पण 1980 नंतर याला वेग आला आणि तो 2014 पर्यंत सुरू राहिला. या काळात प्रत्येकवेळी काही आर्थिक व्यवहाराशी संबंधित गोष्टी घडल्या असे नाही. पण ज्याला ज्या सत्तेवर बसविले मग ते राजकीय असो किंवा प्रशासकीय असो, त्याच्याकडून आपल्याला हवे तसे काम करून घेणे सुरू झाले. यामुळे चुकीच्या गोष्टी घडत गेल्या.

प्रशासनात सकारात्मक बदल

2014 साली नरेंद्र मोदी सत्तेवर येताच त्यांनी या वैयक्‍तिक निष्ठेला पायबंद घातला आणि महासत्तेच्या द‍ृष्टीने वाटचाल सुरू केली. अनेक कर्तृत्ववान अधिकार्‍यांची दखल घेऊन त्यांना थेट पंतप्रधान कार्यालयातून त्यांच्या नव्या जबाबदारीच्या पदावरील नियुक्‍तीचे आदेश जाऊ लागले आणि संपूर्ण प्रशासन एक सकारात्मक बदल घडून आला. हा बदल पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आणला. त्यांच्या धोरणाचा तो भाग आहे आणि याच धोरणावर आधारित आपले पुस्तक प्रसिद्ध झाल्याचे माहुरकर यांनी सांगितले.

उत्तरदायित्व आणि पारदर्शकता या दोन चाकांवर हा महासत्तेचा रथ दौडत असल्याचे सांगताना माहुरकर म्हणाले की, प्रत्येक खात्याचा एक डॅशबोर्ड तयार करण्यात आला. त्यावर तुम्हाला त्याच संबंधित खात्याची आजची काय अवस्था आहे हे त्याच क्षणी कळते. ही पारदर्शकता प्रशासनात आणण्याचे मोठे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशात कोणत्या खात्याने किती काम केले याची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध करून देण्यात येते. पंतप्रधान आवास योजनेत कोणत्या गावात किती घरे दिली, किती घरांचे काम सुरू आहे याची इत्थंभूत माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होते. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी केला तर काय सकारात्मक बदल होतो याचे सर्वात मोठे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. याचा उपयोग एवढा झाला की, उच्च पातळीवर एकाही मंत्रालयावर एकही आरोप आजतागायत झाला नाही. उत्तरदायित्व आणि पारदर्शकता याचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे.

सरकारी खर्चात बचत

आज शासनात ज्या काही गोष्टी किंवा सेवांची गरज लागते त्या सर्व गोष्टी गव्हर्मेंट ई-मार्केटिंग या पोर्टलवरून घेतल्या जातात. ज्यांच्याकडे वस्तू व सेवा उपलब्ध आहेत, ते यावर नोंदणी करतात आणि ज्यांना त्याची गरज आहे अशी सरकारी खाती येथून त्या वस्तू व सेवा मिळवितात. यामुळे सरकारी खर्चात दहा ते वीस टक्के बचत झाल्याचा दावा माहुरकर यांनी केला.

आयकर क्षेत्रात बदल

आयकराच्या क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडवून आणल्याचे सांगून माहुरकर म्हणाले की, प्रामाणिक करदात्यांवर खूप मोठा विश्‍वास ठेवण्यात आला. त्यांच्यासाठी अनेक योजना आखण्यात आला. पूर्वीच्या सरकारने सरकारी लाभांचे थेट हस्तांतरण ही योजना आणली खरी. मात्र ती प्रत्यक्षात राबविण्यासाठी संबंधित व्यक्‍तींची बँक खाती नव्हती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांची जनधन खाती बँकेत उघडण्यासाठी खास योजना आणली. यामुळे सरकारी योजनांचे लाभ आज 42 कोटी खात्यांमध्ये थेट जमा होतात हे सर्वात मोठे यश आहे. यापूर्वी अशा योजनांचे लाभ घेण्यासाठी चेकचे व्यवहार होत आणि चेक देणारा क्‍लार्क पाच हजारच्या रकमेसाठी दोनशे रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत मागणी करीत असे. मात्र ही सारी व्यवस्था मोडीत काढून पारदर्शकता आणण्यात आली. त्याचा लाभ सर्वसामान्य अशा 42 कोटी कुटुंबांना झाला हे केवढे मोठे यश आहे. यूपीआय या सेवेमुळे पैशाची देवाणघेवाण सहजपणे करता येतो. हे सर्वात मोठे तंत्रज्ञानाचे यश आहे.

2070 सालापर्यंत आपल्याला कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणायचे आहे. यासाठी फार मोठे नियोजन भारत करीत आहे. यामध्ये भारताचा जगाचा विश्‍वगुरू होणार आहे. त्याचबरोबर विजेच्या क्षेत्रातही आपण क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत. शंभर गेगावॅट ते 450 गेगावॅटपर्यंत मजल आपल्याला मारायची आहे. त्यासाठी सौरऊर्जा महत्त्वाची आहे. ज्या देशात सूर्यप्रकाश सर्वाधिक उपलब्ध, अशा राष्ट्रांच्या सहाय्याने भारत या क्षेत्रातही नेतृत्व करीत आहे आणि त्यासाठी योग्य प्रकारे पावले टाकली जात आहेत. दहशतवादाच्या मुद्द्यावरही भारताने पाकिस्तानला तसेच दहशतवादाला पाठिंबा देणार्‍या अन्य संघटनांना जागतिक पातळीवर एकाकी पाडले आहे हे फार मोठे यश भारताने मिळविले आहे.

सॉफ्टवेअरमध्ये दबदबा

विज्ञान तंत्रज्ञानाचा सर्वांसाठी वापर करण्याचे सरकारचे ध्येय आहे. याचा सर्वाधिक वापर भारत करीत आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारताचा जगात दबदबा आहे. त्यासाठी अनिवासी भारतीयांना प्रोत्साहित करण्याचे काम नरेंद्र मोदी सातत्याने करीत आहेत. जेथे जातील तेथे ते भारताची विविध क्षेत्रांतील प्रगती आवर्जून सांगतात. यामध्ये एकाच वेळी 104 उपग्रह आपण अवकाशात सोडू शकलो याचाही उल्‍लेख करतात. या सर्व प्रगतीमागे भारताने केलेली आर्थिक प्रगती याचाही उल्‍लेख असतो, असेही ते म्हणाले.
जागतिक पातळीवर ज्या आयटीचा दबदबा आहे, त्याचे नेतृत्व सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांच्यासारखे भारतीय करीत आहेत. त्यांच्याबरोबर अनेक तरुण हात त्यामागे राबत आहेत. म्हणूनच या क्षेत्रातही भारत विश्‍वगुरू म्हणावा लागेल, असेही माहुरकर म्हणाले.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी आपण चीनला घाबरून सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाहीत. डोकलाममधील समस्या ही त्याचा परिणाम असल्याचे सांगून माहुरकर म्हणाले की, त्यावेळी हे केले असते तर ही समस्या उद्भवली नसती. आता हे काम सुरू केल्याने चीनचा जळफळाट झाला आहे.

इतिहासाचे कमी ज्ञान

ते म्हणाले, ही सगळी वाटचाल करीत असताना त्यामध्ये काही अडथळे येत आहेत. यातील सर्वात मोठा अडसर आपल्याला इतिहासाचे कमी ज्ञान हा आहे. त्याचबरोबर फेसबुकवर ज्या घाणेरड्या पोस्ट येतात त्यामुळे आपल्या तरुणाईचे फार मोठे नुकसान होत आहे. मात्र याविरोधात कोणी उभा राहात नाही.
सावरकरांनी पंचशील

तत्त्वाला विरोध केला होता

पंडित नेहरू यांनी पंचशीलचा पुरस्कार केला. त्याला सावरकरांनी विरोध केला होता. त्यामागे त्यांची तर्कशुद्ध मांडणी होती आणि ती अचूक होती हे चीनच्या आक्रमणावरून पुढे सिद्ध झाले. भाईचारा हे आपल्या पंचशीलचे सूत्र होते तर चीनने मशिनगन, बॉम्ब, सबमरीन, मिसाईल अशी त्यांची पंचसूत्री आणून आपल्यावर आक्रमण केले. भारतीय लष्कराने पेशावरपर्यंत मजल मारली. बांगला देश स्वतंत्र केला तरी पाकिस्तानचे एक लाख युद्ध कैदी आपल्याकडे होते. तरी आपण ताश्कंद आणि सिमला करारात गमावल्याचे माहुरकर म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सम्राट असाच उल्‍लेख केला पाहिजे. कारण त्यांच्या मृत्यूनंतरही हे त्यांचे कार्य सुरू ठेवले.

शिवाजी महाराजांचे साम्राज्य हे गुजरातच्या वलसाडपासून ते तामिळनाडूतील जिंजीपर्यंत 1600 कि.मी. एवढे विस्तीर्ण होते. विजयगिरीचे साम्राज्य 700 कि.मी. होते. त्यामुळे आपण छत्रपती शिवराय यांच्यावर सम्राट शिवाजी हा जो ग्रंथ लिहीत आहोत, त्यामध्ये हा सर्व उल्‍लेख येणार आहे. भारताला विश्‍वगुरू होण्यासाठी शिवछत्रपतींचे नेतृत्व हेच प्रेरणादायी असेल, असेही माहुरकर म्हणाले. अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे हीरकमहोत्सवी वर्ष सुरू आहे. पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांनी 1933-34 मध्ये साप्ताहिक ‘सेवक’मधून शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचे स्वप्न पाहिले. ते सत्यात उतरण्यासाठी 30 वर्षांचा काळ गेला. त्यांचे विद्यापीठ स्थापनेत मोलाचे योगदान राहिले.

डॉ. ग. गो. जाधव यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात देशातील पहिले पत्रकारिता अध्यासन सुरू करण्यासाठी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विद्यापीठाची प्रगती व संगीत व नाट्यशास्त्र विभाग, अर्थशास्त्र विभागाच्या उभारणीत डॉ. जाधव त्यांचा मोलाचा वाटा आहे. 130 कोटी भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ‘भारत : एक जागतिक महासत्ता’ या विषयावर केंद्रीय माहिती आयुक्‍त उदय माहुरकर यांनी भाषणातून सर्व गोष्टींना स्पर्श केला. ‘यूपीआय’, डिजिटायजेशनच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनातील समावेशक गोष्टींचा विचार त्यांनी मांडला.

कोरोना काळात या गोष्टींचा मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी व गरिबी निर्मूलनासाठी देश पातळीवरील नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची आहे. या गोष्टीच भारताला महासत्ता बनविण्यासाठी आवश्यक असून त्याद‍ृष्टीने वाटचाल सुरू आहे. मात्र सोशल मीडिया तरुणाईस वाईट मार्गावर घेऊन जात आहे. हे देश महासत्ता बनण्यासाठी मोठे आव्हान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार व आचारापासून फारकत घेऊन देश महासत्ता होऊ शकत नाही. त्यासाठी एकनिष्ठ राहून सर्वजण पुढे जाऊ या, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी करून दिली. सूत्रसंचालन निवेदक विश्‍वराज जोशी यांनी केले. मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले.

‘पुढारी’ची संपूर्ण देशाला ऊर्जा

‘पुढारी’ची संपूर्ण देशालाच ऊर्जा मिळत आहे. अशा वर्तमानपत्राचे कर्तेधर्ते डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी त्याची पात्रता आणि प्रतिष्ठा निर्माण केली आहे. ‘पुढारी’ हा देशातील पहिल्या तीन क्रमांकाच्या वर्तमानपत्रापैकी एक आहे, असे गौरवोद‍्गार माहुरकर यांनी काढले. डॉ. जाधव यांच्या कार्याने आपण प्रभावित असल्याचे सांगत, पत्रकार मोठे झाले की त्यांना राजकारणाचे वेध लागतात. पण नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचे ‘पुढारी’ हे मोठे उदाहरण असल्याचे सांगत डॉ. जाधव यांच्यासारख्या पत्रकारांची देशाला गरज असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचलतं का?

Back to top button