दुष्काळी जत तालुक्यात विक्रमी पाऊस; गुड्डापूर मंदिर परिसरात साचले पाणी | पुढारी

दुष्काळी जत तालुक्यात विक्रमी पाऊस; गुड्डापूर मंदिर परिसरात साचले पाणी

जत; पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी जत पूर्व भागामध्ये पावसाने जोरदार सलामी दिली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक बंधारे पाण्याखाली तर काही पुलावरुन पाणी जात असल्याने पाच्छापूर ओढा, वळसंग – सोरडी रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने, मिरवाड, मुचंडी येथील रस्त्यावर पाणी आल्याने काही गावाचा संपर्क तूटला होता. अनेक बंधारे व इतर जलस्रोत पाण्याने भरून तुडूंब वाहत आहेत. कर्नाटक महाराष्ट्र भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर धानम्मा देवी मंदिरात पाणी साचल्याने गुडघाभर पाण्यातून भक्तांना प्रदक्षिणा घालण्याची वेळ आली.

शुक्रवारी सकाळी सहा वाजता तालुक्यातील पावसाची मोजलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे : जत ७८ मि.मी, शेगांव २८ मि.मी, माडग्याळ ८३ मि. मी., मुचंडी ७३ मि.मी, डफळापूर ५४ मि.मी, उमदी ७३ मि.मी, संख ४५ मि.मी, कुंभारी २८ मि.मी इतकी नोंद झाली आहे. असे एकूण ९३.४ मि.मी असा जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक माडग्याळ येथे ८३ मि.मी तर जतला ७८ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

या पावसाने नागरिकांचे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. नागरिकांना पावसाने सक्तीच्या सुट्टी घेण्यास भाग पाडून घरी बसवले. गेल्या वीस वर्षात प्रथमच खरीप हंगमासाठी वेळेत पाऊस झाला आहे, हे दिलासादायक आहे.

दरम्यान, वळसंग सोरडी रस्ता पुलावर पाणी आल्याने आज दुपारी पर्यंत वाहतुकीस बंद होता. तसेच कोळगिरी पुलावर पाणी आल्याने उमदीकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद होती. दरीबडची भागात काही जुन्या घरांची पडझड झाली आहे. तर जत शहरातील शंकर कॉलनी भागात अनेकांच्या घरात पाणी घुसले, तसेच येथील गार्डनला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

बिळूरला तलावात अडकला डंपर

जत तालुक्यातील बिळूर येथील शिंधीहाळ तलावात शेतीसाठी माती आणण्यास गेलेला डंपर अचानक आलेल्या पावसामुळे अडकून पडला आहे. डंपर पाण्यात बुडला असल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Back to top button