कोल्हापूर : जोतिबाच्या नावानं चांगभलं… | पुढारी

कोल्हापूर : जोतिबाच्या नावानं चांगभलं...

कोल्हापूर : सागर यादव

महाराष्ट्रासह कर्नाटक,, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा होय. प्राचीन काळापासूनच्या पोथी-पुराणांमध्ये उल्लेख असणार्‍या जोतिबाला ‘लोकदैवत’ म्हणूनही संबोधले जाते. जोतिबाची चैत्र यात्रा प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

विविध नावांनी ओळख

दख्खनचा राजा, रवळनाथ, केदारनाथ, केदारलिंग, सौदागर, ज्योतिर्लिंग, हैबती अशा अनेक नावांनी जोतिबाची ओळख सर्वदूर आहे. श्री जोतिबा हा मूळचा केदारनाथ असून, बद्रीकेदार हिमालयातून दक्षिण काशीत आल्याचा उल्लेख ‘केदार विजय’ ग्रंथात आहे. कोल्हासुर राक्षसाने करवीर राज्यात उच्छाद मांडल्याने अंबाबाई देवीने बद्रीकेदारांना विनवणी करून बोलावले. त्यानुसार बद्रीकेदार ‘जोतिबा’चा अवतार घेऊन करवीरात आले. ब—ह्मा, विष्णू, महेश, रवी, अग्नी या पाच देवतांची शक्ती एकत्र करून जोतिबाचा अवतार निर्माण झाल्याचे उल्लेख धार्मिक ग्रंथात आहेत.

करवीरात जोतिबा व त्यांचे सेनापती तोरणभैरव आणि अन्य देवतांनी कोल्हासुर, रत्नासुर, रक्तभोजासुर, गुघ—ासुर, देवील, महिषासुर, सिंधुर या राक्षसांसह त्यांच्या सैन्याची दाणादाण उडवून त्यांचा पराभव केला. यामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ‘चांगभलं’चा जयघोष करण्यात आला. हीच जोतिबाच्या चैत्र यात्रेमागची पार्श्वभूमी आहे. त्यानुसार प्रतिवर्षी जोतिबा यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत, पारंपरिक पद्धतीने आणि अपूर्व उत्साहात साजरी केली जाते. (समाप्त)

दै. ‘पुढारी’चे योगदान

जोतिबा परिसर विकासासाठी सन 1990 ला महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पाच कोटींच्या आराखड्याला राज्य शासनाकडून निधी मिळणार नाही, ही जबाबदारी समितीच्या अध्यक्षांवर राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच सर्वांनी एकमुखाने दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे नाव समितीच्या अध्यक्षपदासाठी सुचविले. मुख्यमंत्र्यांनीही तत्काळ मंजुरी दिली.

अवघ्या सहा महिन्यांत 31 जानेवारी 1991 रोजी जोतिबा डोंगरावरील विकासकामांचा प्रारंभ डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते झाला. रस्ते, पार्किंग, पिण्याचे पाणी, परिसरात वनीकरण, शौचालये-स्वच्छतागृहे, सांडपाणी निर्गत व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते व रुंदीकरण, जोतिबा व यमाई मंदिर परिसरात फरशी बसविणे, दीपमाळांचं स्थलांतर, सेंट्रल प्लाझाची निर्मिती, कमर्शियल कॉम्प्लेक्सची उभारणी, स्मृतिभवन, भूमिगत विद्युतीकरण यासह असंख्य कामांचा यात समावेश होता. तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख व राजगोपाल देवरा, देवस्थान समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, आ. संजीवनीदेवी गायकवाड, आ. विनय कोरे अशा लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांच्या मदतीने ही कामे सुरू करण्यात आली होती. यापैकी अनेक कामे आज मार्गी लागली आहेत.

Back to top button