जागतिक हवामान दिन विशेष : कोल्हापूरला हवामान बदलाची झळ? | पुढारी

जागतिक हवामान दिन विशेष : कोल्हापूरला हवामान बदलाची झळ?

कोल्हापूर ; आशिष शिंदे : हवामान बदलाचे (जागतिक हवामान दिन विशेष) गंभीर संकट जगासमोर काळ बनून उभे आहे. दुष्काळ, महापूर आणि चक्रीवादळासारख्या प्रलयकारी घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रालाही याचा तडाखा बसला आहे. सधन आणि निसर्गसंपन्‍न समजल्या जाणार्‍या कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांना हवामान बदलाची झळ बसण्याची शक्यता आहे. जल, ऊर्जा, पर्यावरण परिषदेच्या नुकत्याच आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

गेल्या पाच दशकांमध्ये कोल्हापूरमध्ये महापूर, वादळे, उष्णतेच्या लाटा व वीज कोसळण्याच्या 101 घटना घडल्याचे भारतीय हवामान संशोधन आणि सेवा कार्यालयाकडील आकडेवारी सांगते. 1969 ते 2019 या कालावधित कोल्हापूरला 28 वेळा पुराचा फटका बसला आहे. तर वीज कोसळण्याच्या 23 घटना घडल्या आहेत. तसेच 1981 ते 2010 या कालावधीत 13 वेळा वादळांचा तडाखा बसला आहे.

जल, ऊर्जा, पर्यावरण परिषदेच्या हवामान तीव्रता निर्देशांकानुसार, आसाम, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारला महापूर, दुष्काळ आणि चक्रीवादळाचा फटका बसण्याचा घोका आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसणार्‍या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. या सर्व हवामान बदलांचा परिणाम कोल्हापूरलाही सहन करावा लागण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्‍त केली.

उष्णतेच्या लाटेचा धोका (जागतिक हवामान दिन विशेष)

वाढत्या उष्म्यामुळे कोल्हापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. कोल्हापुरात मार्च महिन्यात पारा 39.5 अंशांपर्यंत जात आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये तब्बल 41 वेळा उष्णतेच्या लाटेचा फटका कोल्हापूरला बसला आहे. थंडीत नीचांकी तापमान नोंदवले गेल्याने तर उन्हाळ्यात उच्चांकी तापमान अशा नव्या नोंदीमुळे हवामान बदलाची भीती व्यक्‍त केली जात आहे.

यंदाची जागतिक हवामान दिनाची थीम

वेळीच मिळालेली चेतावणी आणि त्वरित कारवाई ही यंदाच्या जागतिक हवामान दिनाची संकल्पना आहे. हवामानात होणार्‍या बदलांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो.

Back to top button