कोल्हापूर : शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेडचे आंदोलन | पुढारी

कोल्हापूर : शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी बिग्रेडच्या वतीने शनिवारी मिरजकर तिकटी येथे एक दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. दि. 19 मार्च 1986 रोजी या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झाली.

यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावातील शेतकरी स्मृतिशेष साहेबराव पाटील-करपे यांनी त्या दिवशी आपली पत्नी व चार लेकरांसह वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर कुष्ठधामात सामूहिक आत्महत्या केली. शासनाची शेतकरीविरोधी धोरणे व त्यातून शेती व्यवसायाची झालेली विदारक अवस्था हेच त्या सामूहिक मरणकांडामागील मुख्य कारण होते.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील, अभिजित भोसले, नीलेश सुतार, अमरसिंह पाटील भगवान कोईगडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

देशात 4 लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी मागील काही वर्षांत चुकीच्या सरकारी धोरणांमुळे आपले आयुष्य संपविले आहे. शेतीसोबत निगडीत असलेल्या सर्वांप्रती संवेदना व्यक्‍त करणे हे प्रत्येक संवेदनशील व विचारी माणसाचे कर्तव्य आहे. त्यामुळे आत्महत्या केलेल्या समस्त शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या कमाल शेतजमीन धारणा (सिलिंग), आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण आदी नरभक्षक कायद्यांचा विरोध करण्यासाठी व शेतकरी स्वातंत्र्याचा संकल्प बळकट करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

हे ही वाचलं का ?

Back to top button