खिद्रापूर : खजुराहोच्या धर्तीवर व्हावी कोपेश्‍वर मंदिराची दुरुस्ती | पुढारी

खिद्रापूर : खजुराहोच्या धर्तीवर व्हावी कोपेश्‍वर मंदिराची दुरुस्ती

खिद्रापूर ; देविदास लांजेवार : ‘टुरिझम डेस्टिनेशन ऑफ कोल्हापूर’ म्हणून नुकतेच घोषित करण्यात आलेल्या खिद्रापूर येथील प्राचीन शिल्पवैभव असलेल्या कोपेश्‍वर मंदिरातील स्वर्गमंडपाला अखेरची घरघर लागली आहे. स्वर्गमंडपाचे दुभंगलेले शिलाखंड काढून त्याजागी नवे शिलाखंड बसविण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण स्वर्गमंडप कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे खजुराहोच्या प्राचीन मंदिर समूहाची जशी काळजीपूर्वक दुरुस्ती करून त्यांना नावीन्य प्रदान करण्यात आले, तशीच दुरुस्ती स्वर्गमंडपाची केली तरच खिद्रापूरचा हा प्राचीन वारसा जतन होऊ शकतो.

अशी दुरुस्ती करण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने किमान 200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील पुरातत्त्व अभ्यासकांनी केली आहे. मागील वर्षी राज्य शासनाने कोपेश्‍वर मंदिर आणि परिसराच्याविकासासाठी 12 कोटींच्या निधीची घोषणा केली. मात्र या निधीचे काय झाले, हे कळायला मार्ग नाही. मात्र आता कोपेश्‍वर मंदिर वाचवायचे असेल तर किमान 200 कोटींची तरतूद करण्याची आवश्यकता आहे.

महापुरामुळे तब्बल 10-12 दिवस पाण्यात बुडालेले मंदिर चहुबाजूंनी गाळाने वेढले गेल्याने मंदिराच्या भिंती कमकुवत झाल्या आहेत. या भिंतीना भेगा पडल्या आहेत. या भेगांमधून हलक्या पावसाचे पाणीही आता मंदिरात झिरपू लागले आहे. सर्वांत दयनीय अवस्था आहे ती, शिल्पकलेचा अजोड आणि अद्भुत आविष्कार असलेल्या गोलाकार स्वर्गमंडपाची. दोन महापुरांनी सर्वाधिक नुकसान स्वर्गमंडपाचे केले आहे. वर्तुळाकार पाषाणी रचना पेलून धरणारे स्तंभ आणि त्यावरील शिलाखंडांना मोठे तडे गेले आहेत. जवळपास 5 ते 6 खांब बाहेरील बाजूला झुकलेले आहेत.

स्वर्गमंडप आणि सभामंडपाच्या प्रदक्षिणा मार्गावरील अधिष्ठानाच्या ठिकाणच्या शिळा निसटून बाहेर पडत आहेत. काही शिळांनी तर केव्हाच मंदिराच्या भिंतीची साथ सोडली आहे. काही हौशी पर्यटक स्वर्गमंडपाच्या बाहेरील बाजूने स्वर्गमंडपाच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करतात आणि छायाचित्रे काढतात. त्यामुळे कमकुवत झालेल्या शिळा निसटून बाहेर येत आहेत. या मंदिराची दुरुस्ती झाली नाही तर नजीकच्या भविष्यात पर्यटकांच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी सध्याची स्थिती आहे.

कोपेश्‍वर मंदिराचे शिल्पवैभव वाचवा : गावकर्‍यांची मागणी

मध्य प्रदेशातील खजुराहो, राजस्थानातील जयपूर येथील प्राचीन मंदिर समूहातील काही मंदिरांना तडे गेल्याने आणि भेगा पडल्याने पुरातत्त्व विभागाने भग्‍न मंदिराची एकेक शिळा बाहेर काढून नंबरिंग (संख्यांक) पद्धतीचा वापर करून ही मंदिरे दुरुस्त केली आणि त्यांना पूर्वस्थिती प्रदान केली. खजुराहो येथील अनेक प्राचीन भग्‍न मंदिरांना अशाच पद्धतीने नावीन्य प्रदान करण्यात आले. खिद्रापुरातील एका पुरातत्त्व अभ्यासकानेही अशाच आधुनिक पद्धतीचा अवलंब कोपेश्‍वर मंदिराच्या दुरुस्तीवेळी करण्याचा सल्‍ला दिला आहे. सध्या खांबांना ज्या तात्पुरत्या बंधपट्ट्या बांधलेल्या आहेत, त्या दीर्घकाळ टिकू शकणार नाहीत.

स्वर्गमंडपातील दुभंगलेले शिलाखंड काढून त्या जागी नवे शिलाखंड बसवावे लागतील. मात्र अशावेळी संपूर्ण स्वर्गमंडप कोसळण्याची भीती आहे. दुभंगलेले शिलाखंड दुरुस्त करायचे तर संपूर्ण स्वर्गमंडप खाली उतरवावा लागेल. मात्र हे काम महाकठीण आणि धोकादायक आहे. त्यामुळे उत्तर आणि मध्य भारतातील मंदिर समूहाच्या दुरुस्तीच्या धर्तीवर स्वर्गमंडपाची नंबरिंग पद्धतीने काळजीपूर्वक दुरुस्ती करावी, असा सल्‍ला देत खिद्रापूरचे अनुपम कलावैभव वाचवावे, अशी मागणी या पुरातत्त्व अभ्यासकाने केली आहे.

Back to top button