पन्हाळा : पन्हाळगड पर्यायी रस्त्यावर वाहतूक कोंडी | पुढारी

पन्हाळा : पन्हाळगड पर्यायी रस्त्यावर वाहतूक कोंडी

पन्हाळा ; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळ्याकडे जाणार्‍या पर्यायी रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर एकमार्गी वाहतूक सुरू करावी. त्यासाठी दोन्ही बाजूला वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वॉकीटॉकीसह कर्मचार्‍यांची व्यवस्था करावी, अशी मागणी पर्यटक व नागरिकांतून होत आहे.

पन्हाळागडावर ये-जा करण्यासाठी बुधवार पेठ ते रेडेघाटीमार्गे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर चारचाकी वाहनांची दररोज कोंडी होत आहे.हा रस्ता जंगलातून जात असल्याने खडीकरण करून घेण्यात आले आहे. हा रस्ता केवळ दहा फूट रुंद असल्याने या ठिकाणी दोन चारचाकी वाहने एकावेळी ये-जा करू शकत नाहीत. पन्हाळगडावरून जाणारी वाहने लता मंगेशकर बंगल्याच्या भागात थांबवावी लागतात, तरच बुधवार पेठ येथून येणारी वाहने गडावर येऊ शकतात.

मात्र, यासाठी नगरपालिका व पोलिस यंत्रणेने वॉकीटॉकीसह कायमस्वरूपी मंगेशकर बंगल्याच्या परिसरात कर्मचारी नेमावेत व वाहतूक नियंत्रित करावी, अशी मागणी होत आहे. सध्या अशी व्यवस्था नसल्याने समोरासमोर वाहने येऊन कोंडी होते. मोठी वाहने, ट्रकदेखील याच रस्त्यावरून येत असल्याने त्यामध्ये भर पडते.

अनेक पर्यटक याच मार्गावर वाहने थांबवून सेल्फी घेतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. नियंत्रणाअभावी अनेकदा वाहतूक पूर्णपणे ठप्प होते आणि दोन्ही बाजूंची वाहने अडकून पडतात. वाहनधारकांत वरचेवर वादावाद होत असतात; मात्र पोलिस नसल्याने वादामुळेही वाहतूक खोळंबते.

रेडेघाटी ते काली बुरुज परिसरामधील जंगलात गव्यांचा कळप आहे. सायंकाळी सहानंतर येथून प्रवास करणे धोकादायक आहे, तरीही रात्री अनेकजण अवजड वाहने घेऊन या रस्त्यावर येतात. ही वाहतूक धोकादायक असतानाही नगरपालिकेने यावर बंदी घातली नाही.

दुचाकींची वाहतूक दरड कोसळलेल्या रस्त्याने धोकादायक स्थितीत सुरू आहे. ही वाहतूक स्वत:च्या जबाबदारीवर करावी, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असणार नाही, असे फलक लावून संबंधितांनी आपली जबाबदारी झटकली आहे.

पन्हाळा मुख्य रस्ता दुरुस्तीचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. मार्चअखेरीस हा रस्ता पूर्ण होईल, अशी माहिती शाखा अभियंता अमोल कोळी यांनी दिली आहे.

पोलिस गस्त सुरू करावी…

शनिवारी व रविवारी सकाळपासून रात्री अकरा वाजेपर्यंत या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. सकाळपासून या ठिकाणी नगरपालिकेने वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी नेमावेत. वॉकी, टॉकीचा वापर करून दोन्ही बाजूंनी एकावेळी दहाच वाहने सोडण्यात यावीत. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पन्हाळा पोलिसांनी या रस्त्यावर गस्त सुरू करावी, अशी मागणीही प्रवाशांकडून केली जात आहे.

* केवळ दहा फूट रुंदीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक
* एकेरी वाहतुकीसाठी दोन्ही ठिकाणी वॉकीटॉकीसह यंत्रणेची गरज
* अवजड वाहनांची वाहतूकही याच रस्त्याने सुरू
* वाहनधारकांत वारंवार वादावादी

Back to top button