सांगली-कोल्हापूर महामार्ग ठप्प | पुढारी

सांगली-कोल्हापूर महामार्ग ठप्प

जयसिंगपूर ; पुढारी वृत्तसेवा : सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव (ता. शिरोळ) येथील रेल्वे ओव्हर ब्रीजच्या खालून ऊस भरून चाललेला ट्रॅक्टर बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी होऊन तब्बल 3 तास सांगली-कोल्हापूर महामार्ग ठप्प झाला होता. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास ठप्प झालेली वाहतूक दुपारी 3 वाजता सुरळीत झाली. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.

उदगावात अद्यापही वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटलेला नाही. सांगली-कोल्हापूर महामार्ग वरून मिरज-कोल्हापूर लोहमार्गाचा रेल्वे ओव्हर ब्रीज उदगाव येथे आहे. यापूर्वी मोठे कंटेनर, पवणचक्‍की वाहतूक कंटेनर यासह इतर वाहने अडकून या ओव्हर ब्रीजच्या परिसरात वाहतूक कोंडी होते. गुरुवारी सांगलीकडून शिरोळकडे येणार्‍या उसाची वाहने ओव्हर ब्रीजच्या खाली आल्यानंतर ट्रॅक्टर बंद पाडला. त्यामुळे वाहतूक कोंडीला वाव मिळाला. यामुळे ही वाहतूक जयसिंगपूरपर्यंत ठप्प झाली होती. तर सांगलीकडील बाजूला अंकली ते धामणी फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अखेर जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव येथे येऊन वाहने सुरळीतपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली. शिवाय दोन तास अडकलेली वाहने मिरजकडे जाण्यासाठी चिंचवाड-अर्जुनवाडकडे सोडण्यात आली. तर सांगलीकडे जाणारी वाहने उदगाव रेल्वे स्टेशन मार्गावरून बायपास मार्गावर वळविण्यात आले. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

Back to top button