कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून लाकडी दांडके व अवजड हत्याराने हल्ला करून पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील विकास आनंदा पाटील (वय 40) यांचा रविवारी सायंकाळी खून करण्यात आला. मुख्य संशयित व लष्करी जवान युवराज शिवाजी गायकवाड (45, रा. पोर्ले तर्फ ठाणे) सह तिघे हल्लेखोर पसार झाले आहेत.
रात्री उशिरापर्यंत हल्लेखोर पोलिसांच्या हाताला लागले नव्हते. एकेकाळी जिवलग मित्र असलेल्या विकास पाटील व संशयित युवराज गायकवाड यांच्यात पाच-सहा महिन्यांपासून मतभेद निर्माण झाले होते. भारतीय सैन्य दलात जवान असलेला युवराज फेब्रुवारीमध्ये सुट्टीवर गावाकडे आला होता. यावेळी त्याच्यात दोन-तीनवेळा वादावादीही झाली होती. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. विकासने युवराजला मारहाण केल्याने हा वाद विकोपाला गेला होता.
विकासने चारचौघांत मारहाण केल्याने युवराज चिडून होता. फेब्रुवारीमध्ये नोकरीवर हजर होण्यासाठी जात असताना त्याने परत गावाकडे सुट्टीवर आलो की तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती.
संशयित युवराज दोन दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गावी आला होता. मात्र त्याची चाहूल त्याने कोणालाही लागू दिली नाही. रविवारी सायंकाळी विकास आई शालाबाईसह शेतात गेला होता. डेअरीला दूध घालून तो घराकडे परतत असताना यवलूज-पोर्ले रस्त्यावर दबा धरून बसलेल्या युवराजसह साथीदारांनी विकासला रस्त्यावरच रोखले.
आईच्या डोळ्यादेखत हल्लेखोराकडून जीवघेणा हल्ला
दुचाकीला लाथ मारल्याने विकास व त्याची आई जमिनीवर कोसळली. संशयितासह तिघांनी विकास पाटील याच्यावर दांडक्यासह हातोड्यासारख्या अवजड हत्यारांनी जोरात हल्ला चढविला. वर्मी हल्ल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात तडफडणार्या मुलाला वाचविण्याचा आईने आरडाओरड केली. मित्र विकास भोपळे व विश्वास पाटील धावत आले. त्यांनी विकासला दुचाकीवरून सीपीआरमध्ये हलविले. मात्र उपचारापुर्वी त्याचा मृत्यू झाला.
पाणी प्यायला अन् सोडला प्राण
डोक्यावर, पायावर झालेल्या हल्ल्यामुळे विकास गंभीर जखमी झाला. दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत असताना तो मित्रांशी बोलत होता. केर्लीजवळ येताच त्याने विकास भोपळे व विश्वास पाटील यांच्याकडे पाण्याची मागणी केली. दोघांनीही त्याला पाणी पाजले. मात्र रुग्णालयात दाखल करताच विकासने जीव सोडला. या घटनेमुळे दोघांचाही आक्रोश सुरू होता.
विकासचा मृत्यू झाल्याचे समजताच पोर्ले तर्फ ठाणे येथील पाटील कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली. कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. पन्हाळा पोलिस ठाणे, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारीही दाखल झाले होते.