अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 410.90 अंक व 1252.56 अंकांची वाढ नोंदवून दोन्ही निर्देशांक 22466.1 अंक आणि 73917.03 अंकांच्या पातळीवर पोहोचले. निफ्टीमध्ये 1.86 टक्के व सेन्सेक्समध्ये 1.72 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (14.4 टक्के), अदानी एन्टरप्राईसेस (9.7 टक्के), अदानी पोर्टस् (5.8 टक्के), हिंडाल्को (5.7 टक्के), लार्सन अँड टुब्रो(5.6टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला तर सर्वाधिक घट दर्शवणार्‍या समभागांमध्ये टाटा मोटर्स (-9.3 टक्के), नेस्ले इंडिया (-2.4 टक्के), बजाज ऑटो (-1.9 टक्के), डॉ. रेड्डीज (-1.5 टक्के), एचयूएल (-1.3 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला.

* देशात खासगी क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) व्यवहार सर्वसामान्यांसाठी खुले करावेत, अशी भूमिका भांडवलबाजार नियामक संस्था ‘सेबी’ ने घेतली. रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेला काहीशी छेद देणारी ही भूमिका असल्याचे म्हटले जाते. केंद्रिय अर्थमंत्रालयाने क्रिप्टो करन्सी व्यवहार संदर्भात राष्ट्रीय स्तरावर धोरण मसुदा तयार करण्यासाठी विविध नियामकांची तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. या अहवालात रिझर्व्ह बँकेने आभासी चलन व्यवहार सुरू करण्यास विरोध दर्शवला आहे, तर सेबीने संस्थेने हे व्यवहार नियंत्रित प्रमाणात आणि नियमावलीसह सुरू करण्यात यावेत, यासाठी अनुकूल असल्याचे मत नोंदवले.

* दिवाळखोरी प्रकरणांमध्ये बँकांना बुडीत रकमेच्या 73 टक्क्यांपर्यंत पाणी सोडावे लागत असल्याचे पतमानांकन संस्था ‘इफ्रा’ च्या अहवालात माहिती. एकूण 100 रुपयांचे बुडीत कर्ज असेल तर बँकांना यापैकी केवळ 23 रुपये परत मिळत आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये एकूण 269 बुडीत कर्जाची प्रकरणे निकाली काढण्यात आली यावरून ही माहिती मिळाली आहे. दिवाळखोरीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी 330 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. आता हा सरासरी कालावधी 843 दिवसांवर पोहोचला आहे.

* युनायटेड नेशन्सने भारताच्या अर्थव्यवस्था वृद्धिदरांचा अंदाज 6.2 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांवर नेला. 2024 साली भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणार असल्याचे सूचक युनायटेड नेशन्स संघटनेने केले. 2025 सालचा अर्थव्यवस्था वृद्धीदर अंदाज 6.6 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला.

* मार्च 2024 च्या तिमाहीत व्होडाफोन आयडियाला 7,674 कोटींचा तोटा झाला. कंपनीचा प्रतिग्राहक सरासरी महसूल 146 रुपये झाला. कंपनीचा महसूल 0.6 टक्क्यांनी घटून 10,607 कोटी झाला.

* एप्रिल महिन्यात भारतातील घाऊक महागाई दर (होलसेल प्राईस इंडेक्स) मागील 13 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 1.26 टक्क्यांवर पोहोचेल. मार्च महिन्यात हा महागाई निर्देशांक 0.53 टक्के होता. त्याचप्रमाणे किरकोळ महागाईदर (रिटेल इन्फ्लेशन) मागील 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 4.83 टक्क्यांवर आले. मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर 4.85 टक्के होता. यामध्ये प्रामुख्याने अन्नधान्य महागाई दर वाढला. अन्नधान्य महागाई दर एप्रिलमध्ये 807 टक्क्यांवर पोहोचला. मार्चमध्ये हाच महागाई दर 8.52 टक्के होता.

* गृहकर्ज पुरवठा करणारी खासगी कंपनी ‘श्रीराम हाऊसिंग फायनान्स’ ला अमेरिकेच्या वॉरबर्ग पिन्कसने 4,630 कोटींना खरेदी केले. श्रीराम हाऊसिंग फायनान्सची मालमत्ता 1,924 कोटींची असून, 155 शाखा आहेत. ‘श्रीराम हाऊसिंग फायनान्स’ ही ‘श्रीराम फायनान्स’ ची उपकंपनी आहे. या व्यवहाराद्वारे श्रीराम फायनान्सला 3,909 कोटी मिळणार आहेत. 7 फेबु्रवारी 2025 पर्यंत हा व्यवहार पूर्ण होणे अपेक्षित आहे.

* देशातील महत्त्वाची एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी कोलगेट पामोलिव्हचे तिमाही मार्च 2024 चे आर्थिक निकाल जाहीर. कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 20.11 टक्के वधारून 379.82 कोटींवर पोहोचला. कंपनीचा महसूल 10.35 टक्के वधारून 1480.66 कोटींवर गेला. कंपनीचे इबिटा मार्जिन देखील मागील वर्षीच्या तुलनेत 18 टक्के वधारून 532 कोटी झाले.

* अमेरिकेची बलाढ्य ई-कॉमर्स कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’ ने भारतातील स्वतःची उपकंपनी अ‍ॅमेझॉन सेलर सर्व्हिसेसमध्ये 1,660 कोटींची गुंतवणूक केली. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये व्यवसाय विस्तारासाठी 830 कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती. 2030 सालापर्यंत अ‍ॅमेझॉनची भारतात सुमारे 15 अब्ज डॉलर्स (सुमारे 1 लाख 30 हजार कोटी) गुंतवणूक करण्याची योजना आहे. नुकतेच अ‍ॅमेझॉनची अमेरिकेतील प्रतिस्पर्धी वॉलमार्ट कंपनीने फ्लीपकार्ट या भारतीय कंपनीमध्ये 600 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 5 हजार कोटींची) गुंतवणूक केली होती.

* आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतातील शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण 6.6 टक्क्यांपर्यंत खाली आले. मागील वर्षी हे प्रमाण 7.2 टक्के होते. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने हे आकडे जाहीर केले.

* जिंदाल समूहाची प्रमुख कंपनी ‘जिंदाल स्टेनलेस’ चा मार्च 2024 च्या तिमाहीचा निव्वळ नफा 30 टक्के घटून 501 कोटींपर्यंत खाली आला. कंपनीचा एकूण महसूल 3 टक्के घटून 9,454 कोटींपर्यंत खाली आला. कंपनीचे इबिटा मार्जिन 10 टक्केपर्यंत खाली येऊन 1,035 कोटी झाले. व्यवसाय विस्ताराच्या द़ृष्टीने आर्थिक वर्ष 2025 साठी कंपनीने 4,700 कोटींचा निधी खर्च करण्याचे (कॅपेक्स) योजले आहे. निकेल धातूच्या वाढलेल्या किमतीमुळे कंपनीचा नफा रोडावल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

* खाणकाम उद्योगातील बलाढ्य कंपनी ‘वेदांता’ ला 8,500 कोटींचा निधी उभारण्याची मान्यता मिळाली. लंडनस्थित ‘वेदांता रिसोर्सेस’ ही भारतीय कंपनी ‘वेदांतां’ची प्रमुख कंपनी आहे. या वेदांता रिसोर्सेस कंपनीने मागील दोन वर्षांत स्वत:वरचे 3.7 अब्ज डॉलर्स (सुमारे 31 हजार कोटींचे) कर्ज कमी केले आहे. पुढील तीन वर्षांत आणखी 3 अब्ज डॉलर्स ( सुमारे 25 हजार कोटी रुपये) कर्ज कमी करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. हा उभा केलेला निधीदेखील कर्ज कमी करण्यासाठी वापरला जाणार. कंपनीच्या संचालक मंडळाने सौदी अरेबियात तांबे धातू गज ( कॉपर रॉड) बनवण्याचा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावालादेखील मान्यता दिली.

* देशातील महत्त्वाची दूरसंचार कंपनी ‘भारती एअरटेल’ या मार्च 2024 च्या तिमाहीचा नफा 15 टक्के घटून 2,072 कोटी झाला. एअरटेलचा नायजेरिया देशातदेखील व्यवसाय आहे. नायजेरियाचे चलन डॉलरच्या तुलनेत कोसळले यामुळे एअरटेलला 2,455 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. यामुळे एकूण निव्वळ नफ्यात 15 टक्क्यांनी घट नोंदवली गेली. भारतातील कंपनीचा महसूल मागील तिमाहीच्या तुलनेत 2.5 टक्के वधारून 28,513 कोटी झाला. दूरसंचार कंपन्याच्या द़ृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रतिग्राहक सरासरी महसूल (एआरपीयू) म्हणजेच Average Revenue Per User 209 रुपयांवर पोहोचला. मागील तिमाहीत हा 208 रुपयांवर होता.

* महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लवकरच इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीची क्षमता वाढवणार. आर्थिक वर्ष 2027 पर्यंत यासाठी 12 हजार कोटींची गुंवणूक करण्यात येणार आहे. मार्च 2024 मध्ये कंपनीचा महसूल 12.5 टक्के वधावरून 22,614 कोटींवरून 25,436 कोटींवर पोहोचला. कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल 31.6 टक्क्यांची वाढ होऊन, निव्वळ नफा 1,549 कोटींवरून 2,038 कोटींवर पोहोचला.

* 10 मे रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजली 2.561 अब्ज डॉलर्सनी वधारून 644.151 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

Back to top button